अभय योजनेंतर्गत 3 हजार 500 कोटी रुपयांचा कर भरणा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

वस्तू आणि सेवा कर विभागाने अंमलात आणलेल्या अभय योजना २०१९ अंतर्गत विवादित कर, व्याज, शास्ती, विलंब शुल्काच्या थकबाकीच्या रकमेपोटी ऑगस्ट २०१९ पर्यंत साधारणत: ३ हजार 500 कोटी रुपयांचा कर भरणा झाला

मुंबई : वस्तू आणि सेवा कर विभागाने अंमलात आणलेल्या अभय योजना २०१९ अंतर्गत विवादित कर, व्याज, शास्ती, विलंब शुल्काच्या थकबाकीच्या रकमेपोटी ऑगस्ट २०१९ पर्यंत साधारणत: ३ हजार 500 कोटी रुपयांचा कर भरणा झाला अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

राज्यात एक जुलै २०१७ पासून वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू झाली. त्यापूर्वी राज्यात करविषयक अनेक कायदे अमलात होते. काही कर विषयक कायद्यांचा वस्तू आणि कर प्रणालीत समावेश करून ते निरसित करण्यात आले. जुन्या कायद्यातील ३.७३ लाख प्रकरणे आणि खटले प्रलंबित असून त्यात कोट्यवधी रुपयांचा कर महसूल अडकून पडला होता, म्हणून शासनाने वस्तू आणि सेवा कर कायदा येण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या कायद्याअंतर्गत ३० जून २०१७ रोजी किंवा त्यापूर्वी संपणाऱ्या कालावधीसाठी आकारलेले कर, व्याज, शास्ती, किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीच्या तडजोडीसाठी अभय योजना २०१९ आणली व त्यातून विवादित कर, व्याज, शास्ती, किंवा विलंब शुल्क, थकबाकीची तडजोडीच्या प्रकरणांना अंशत: माफी देऊन कर भरण्यास प्रोत्साहन दिले.

यातून १.४० लाख प्रकरणांमध्ये व्यापाऱ्यांनी अभय योजनेचा लाभ घेऊन ३ हजार पाचशे कोटी रकमेचा भरणा केला आहे, अशीही माहिती मुनगंटीवार यांनी दिली. 

(सौजन्य : डीजीआयपीआर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Under Abhay Yojana Payment from tax of Rs 3500 crore