मरणासन्न स्थिती! इव्हेंट मॅनेजमेंट इंडस्ट्रीवरही बेरोजगारीचे काळे ढग;  कार्यक्रमाअभावी लाखो तरुण आर्थिक संकटात

मरणासन्न स्थिती! इव्हेंट मॅनेजमेंट इंडस्ट्रीवरही बेरोजगारीचे काळे ढग;  कार्यक्रमाअभावी लाखो तरुण आर्थिक संकटात

ठाणे  ः लॉकडाऊनमुळे बांधकाम व्यवसायानंतर सरकारला मोठ्या प्रमाणात कर मिळवून देणारी इव्हेंट इंडस्ट्री गेले पाच महिने ठप्प झाली आहे. आजच्या घडीला राज्यातील सुमारे दोन कोटी नागरिक इव्हेंट इंडस्ट्रीत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या काम करतात. खूप वेगाने वाढणाऱ्या या इंडस्ट्रीत 80 टक्के तरुण चाळिशीच्या आतले आहेत. बीएमएमची पदवी मिळवणारा 90 टक्के तरुण वर्ग इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांमध्ये कामाला आहे. कार्यक्रमच होत नसल्याने बऱ्याच कंपन्या आता हळूहळू बंद होऊ लागल्या आहेत. वेळेत या इंडस्ट्रीजला आधार मिळाला नाही तर लाखो तरुण बेरोजगारीच्या खाईत लोटले जाणार आहेत. 

चित्रपट अथवा मालिकांचे चित्रीकरण आता नियमानुसार सुरू झाले आहे, पण लाईव्ह कार्यक्रम सुरू होण्यास अजून किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्‍यता आहे. अशा वेळी अजून किती दिवस कर्मचाऱ्यांना सांभाळायचे, असा प्रश्‍न या क्षेत्रातील कंपन्यांच्या मालकांना पडला आहे. बहुतांश कंपन्यांनी पन्नास टक्के पगार कापून काही प्रमाणात कर्मचाऱ्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. काही जणांना मात्र इव्हेंट सुरू झाल्यानंतरच वेतन सुरू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनाचे संकट टळल्यावर सर्वांत शेवटी इव्हेंट मॅनेजमेंट इंडस्ट्री सुरू होणार असल्याने त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहून सरकारने सवलत देण्याची मागणी होत आहे. 

एखादा कार्यक्रम आखण्यापासून त्याची यशस्वी सांगता होईपर्यंत अनेक टप्पे असतात. साहित्यिक कार्यक्रम, पुरस्कार सोहळे, संगीत महोत्सव, फेस्टिव्हल, नवीन वर्षाचे कार्यक्रम, मिरवणुका, जत्रा, संमेलन, सण-समारंभ, राजकीय सभा, क्रीडा स्पर्धा, विविध प्रकारची प्रदर्शने, लग्ने, वाढदिवस आदी कोणताही कार्यक्रम असू देत त्यासाठी काही विशेष मनुष्यबळाची आवश्‍यकता असते. अशा सर्व व्यक्तींना एका छताखाली आणल्यावर इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी तयार होते. अनेक जण आपल्या कार्यक्रमाची जबाबदारी अशा कंपनीकडे सोपवून निर्धास्त होतात, पण आज रोजगार नसल्याने आणि त्याबाबत नेमके धोरण स्पष्ट होत नसल्याने कित्येक कार्यक्रमांचे यशस्वी व्यवस्थापन करणाऱ्या इव्हेंट मॅनजमेंट कंपन्या कायमच्या बंद करण्याची वेळ आली आहे. 

अशी आहे इव्हेंट मॅनेजमेंट इंडस्ट्री 
कंपनी लहान असो वा मोठी, त्यात अनेक कुशल-अकुशल कर्मचारी काम करत असतात. मजूर, डिझायनर्स, कला दिग्दर्शक, सुतार, इलेक्‍ट्रिशियन, कॅमेरामन, साऊंड इंजिनिअर, एडिटर्स, विविध प्रकारची उपकरणे आणि ती हाताळणारे कुशल तंत्रज्ञ, लाईटमन, खुर्च्या आणि टेबल पुरवणारे, मंडप व्यावसायिक, ग्राफिक आर्टिस्ट, व्हॅनिटी व्हॅन, जनरेटर्स आणि ऑपरेटर्स, ट्रान्सपोर्टर, वाहनचालक, मेकअप आर्टिस्ट, कॅटरर्स, पीआर टीम, अकाऊंटंट आणि फ्रंटवर व बॅक ऑफिसमध्ये काम करणारी टीम असते. एवढी माणसे प्रत्येक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये असतातच. कंपनीच्या लहान-मोठ्या स्वरूपावर त्यांची संख्या ठरते; मात्र गेले चार-साडेचार महिने एवढे मोठे मनुष्यबळ घरी बसून आहे. 

सरकारकडून किमान अपेक्षा 
- जीएसटी आणि आयकर भरण्याची मुदत वाढवून द्यावी 
- कर्जाचे हप्ते भरण्याकरता बॅंकेने किमान सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी 
- कर्जावरील व्याजदरात सवलत द्यावी 
- आमच्या उद्योगासाठी लागणाऱ्या उपकरणांवर सबसिडी देण्यात यावी 
- काही बंधने आणि नियम आखून इव्हेंट मॅनेजमेंट इंडस्ट्री लवकरात लवकर कशी सुरू करता येईल याकरता उपाय करावेत 

सरकारने आम्हाला काही प्रमाणात दिलासा दिल्यास तरुणाईची इंडस्ट्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमच्या उद्योग क्षेत्रातील बेरोजगारी काही प्रमाणात कमी होईल. लाखो तरुणांचा रोजगार त्यावर अवलंबून आहे. सरकारने आम्हाला वेळीच मदत केली नाही, तर भविष्यात व्यवसायात टिकून राहणे सर्वांनाच कठीण होईल. 
- संदीप वेगुर्लेकर,
संचालक, लाईट ऍण्ड शेड

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com