VIDEO| ठाणे जिल्ह्यात पाळली जाते अनोखी प्रथा; भाताच्या कापणीपूर्वी ख्रिश्‍चन धर्मगुरू, शेतकरी करतात प्रार्थना

संदीप पंडित
Friday, 9 October 2020

"आगेऱ्याचा सण.' या दिवशी शेतात जाऊन त्याठिकाणी फादर (धर्मगुरू) आणि गावकरी एकत्र मिळून प्रार्थना करतात आणि मग फादर शेतातील काही कणसे कापून ती वाजत-गाजत चर्चमध्ये आणतात. 

भाईंदर ः पावसाळा सुरू झाला की आपल्याकडे विविध सण सुरू होतात. नारळी पौर्णिमा, गणपती, दिवाळीसह देशात कोजागरी म्हणजेच नवान्नपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. या दिवशी नव्याने आलेली भाताची कणसे काढून त्याचे तोरण बनवले जाते, तसेच त्याची पूजाही केली जाते. असाच सण ख्रिश्‍चन धर्मीय बांधवांमध्येही साजरा केला जातो. तो म्हणजे "आगेऱ्याचा सण.' या दिवशी शेतात जाऊन त्याठिकाणी फादर (धर्मगुरू) आणि गावकरी एकत्र मिळून प्रार्थना करतात आणि मग फादर शेतातील काही कणसे कापून ती वाजत-गाजत चर्चमध्ये आणतात. 

मुंबई रेल्वे गाड्यांचे नियोजन करा; मुंबई उच्च न्यायालयाच्या राज्य सरकारला सूचना

आजही ठाणे, मुंबई, वसई या परिसरातील आगरी, कोळी व इस्टइंडियन ख्रिश्‍चन धर्मीय बांधव भाताचे (तांदूळ) पीक घेतात. पूर्ण पावसाळ्यात एकमेकांच्या मदतीला जाऊन आळी पाळीने भाताच्या लागवडीपासून ते कापणीपर्यंत एकत्रित काम करतात. जेव्हा शेतात भाताची कणसे येतात तेव्हा कापणी अगोदर पहिली कापणी करून देवाला अर्पण करण्याची परंपरा आजही काही ठिकाणी सुरू आहे. यात भाईंदरजवळील उत्तन गावाचा समावेश आहे. या ठिकाणी नागरिक एकत्र येऊन चर्चच्या परिसरातील शेतात जाऊन सर्व भाविक व धर्मगुरू प्रथम एकत्र प्रार्थना करतात, देवाचे आभार मानतात, आमच्या मेहनतीचे फळ आम्हाला दिले व चांगल्या प्रकारे पीक भरभरून आले असे म्हणतात. तसेच, कापणी अगोदर काही भागातील कणसे कापून चर्चमध्ये भक्तिभावाने मिरवणुकीद्वारे घेऊन येतात. 

'एफडीए'ची मोठी कारवाई! तब्बल 35 लाखांचा पान मलासा जप्त; अवैध वाहतूक करणार्‍यांवर दक्षता पथकाचा छापा

चर्चमध्ये पूर्ण प्रार्थना, विधी आटोपल्यानंतर ती कणसे सर्व भाविकांना थोडी-थोडी वाटली जातात. ही कणसे भाविक आपल्या देवघरात वर्षभर सांभाळून ठेवतात. त्यामागचा हेतू असा की, असाच धान्याचा साठा आम्हाला वर्षभर मिळावा व घरात धान्याची टंचाई भासू नये. काही भाविक आपल्या घरात देवघरात ठेवलेल्या कणसांची पूजा-अर्चा करतात. या भात कापणीच्या सणाला आगेऱ्याचा सण असे नाव आहे. 

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A unique practice is observed in Palghar farmers pray before the rice harvest