मुंबई विद्यापीठाकडून अंतिम वर्षाचे वेळापत्रक जाहीर; 1 ते 17 ऑक्टोबरदरम्यान परीक्षा; जाणून घ्या परीक्षेचे स्वरूप

तेजस वाघमारे
Wednesday, 9 September 2020

मुंबई विद्यापीठाने 2019-20 वर्षाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा ऑनलाईन घेण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

मुंबई : मुंबई विद्यापीठाने 2019-20 वर्षाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा ऑनलाईन घेण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. महाविद्यालयांचे क्लस्टर करून परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अंतिम वर्षाची लेखी परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांच्या (एमसीक्यू) स्वरुपात घेण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांना पुनर्मुल्यांकनाची सुविधा उपलब्ध नसेल, असे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार नियमित परीक्षा 1 ते 17 ऑक्टोबरदरम्यान तर बॅकलॉगच्या परीक्षा 25 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. ऑनलाईन लेखी परीक्षा 50 गुणांसाठी व 1 तासांचा कालावधीत घेण्यात येतील.

मराठा आरक्षणाबाबत नारायण राणे यांचा सरकारवर हल्ला; नात्यातले दोन वकील नेमल्याचा आरोप

अंतिम सत्राच्या सर्व परीक्षा 13 मार्चपर्यंत महाविद्यालयांत शिकवलेल्या अभ्यासक्रमावर आधारीत असतील. विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी प्रश्नसंच दिले जातील व सराव परीक्षाही करून घेतल्या जाणार आहेत. परीक्षांच्या सुयोग्य आयोजनासाठी विद्यापीठाने विद्याशाखानिहाय महाविद्यालयांचे क्लस्टर्स तयार केले असून क्लस्टरमधील एका मुख्य महाविद्यालय म्हणून जबाबदारी पार पाडावयाची आहे. ऑनलाईन लेखी परीक्षांसाठीचे वेळापत्रक हे मुख्य महाविद्यालयाने क्लस्टरमधील महाविद्यालयाशी चर्चा करून, सर्व महाविद्यालयांच्या परीक्षा एकाचवेळी होतील, अशा पद्धतीने नियोजन करावे. विद्यापीठ प्राधिकरणांनी ठरविल्याप्रमाणे सर्व लेखी परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. जे विद्यार्थी काही अपरीहार्य कारणास्तव ऑनलाईन लेखी परीक्षा देऊ शकणार नाही अशा विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा संधी देण्याविषयी मुख्य महाविद्यालयमार्फत एकत्रित निर्णय घेण्यात येईल. तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या बॅकलॉगच्या परीक्षा झाल्या आहेत अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा परत होणार नाहीत. अंतिम सत्र किंवा बॅकलॉगचे प्रात्यक्षिक, अहवाल आणि व्हायवाबाबत विविध मीटींग्स अ‍ॅपच्या माध्यमातून व आवश्यकतेनुसार दूरध्वनीद्वारे मौखिक परीक्षा 15 सप्टेंबरपासून घेण्याच्या सूचनाही विद्यापीठामार्फत देण्यात आल्या आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी परीक्षेसाठी आवश्यक त्या सुविधा देण्याच्याही सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत. ऑनलाईन परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने पर्यायी व्यवस्था करण्यात येईल. पर्याय शक्य न झाल्यास अपवादात्मक परिस्थितीत ऑफलाईन पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. 

 

कोरोनाचा प्रादुर्भाव व वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि परीक्षा संबंधित सर्व घटकांच्या आरोग्याची काळजी आणि सुरक्षिततेला प्राधान्य देऊन परीक्षांचे नियोजन करण्यात येणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याकडे आवश्यक तांत्रिक सुविधा नसतील तर त्याच्या आजूबाजूला राहणार्‍या नागरिकांनी व स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी. परीक्षेदरम्यान चांगली इंटरनेट व्यवस्था देण्यासंदर्भात इंटरनेट प्रोवायर्डसना व अखंडीत वीज पुरवठा करावा म्हणून संबंधित घटकांना विद्यापीठामार्फत विनंती केली जाईल.
- प्रा. सुहास पेडणेकर,
कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: University of Mumbai announces final year schedule; Exam from 1st to 17th October: Exam in Multiple Choice Questions (MCQ) format