Unmasking Happiness | डिस्चार्जनंतर घ्यावयाची काळजी आणि उपचार

Unmasking Happiness | डिस्चार्जनंतर घ्यावयाची काळजी आणि उपचार

कोरोनामुळे अनेक रुग्णांच्या वेगवेगळ्या अवयवांवर परिणाम करणारी लक्षणे निदर्शनास येत आहेत. त्यातून बरे होण्यासाठी अनेकांना दीर्घकाळपर्यंत आयसीयूमध्ये राहावे लागत आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही अनेकांना दोन महिन्यांपर्यंत त्रास जाणवत आहे. त्यामुळे आरोग्याची खबरदारी घेण्याची आवश्‍यकता आहे.

कोरोना विषाणूचा अनेक रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. त्यातून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक असले, तरी बहुतांश रुग्णांमध्ये पोस्टकोव्हिड सिन्ड्रोमचे किमान एक तरी लक्षण दिसत असल्याचे डॉक्‍टरांच्या निदर्शनास आले आहे. त्यातही थकवा आणि श्‍वास घेण्यास त्रास होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर दोन महिन्यांपर्यंतही हा त्रास अनेकांना जाणवत आहे. काही रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर शरीरातील ऑक्‍सिजन पातळी कमी झाल्यामुळे अगदी दुसऱ्या दिवशीच थेट अतिदक्षता विभागामध्ये दाखल करावे लागले. पोस्ट कोव्हिड सिन्ड्रोमशी संबंधित या आजारांवर उपचार करून काही दिवसांनी त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांच्या हृदयावर परिणाम झाल्याचेही समोर आले. अनेकांमध्ये हृदयाची गती मंदावणे, हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघातासारखे झाल्याचेही आढळले. कोरोनाचा संसर्ग येऊन आता जवळपास नऊ ते १० महिने होत आल्याने त्यातील धोक्‍यांबाबत वैद्यकीय तज्ज्ञांना बऱ्यापैकी माहिती झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आता कोरोनानंतर रुग्णांच्या आरोग्यविषयक पुनर्वसनाकडे पाहणे गरजेचे आहे. कोरोना होऊन गेल्यानंतर चार ते सहा आठवड्यांमध्ये थकवा, श्‍वास घेण्यास त्रास, सुस्तपणा, अंगदुखी आणि घसा खवखवणे अशा लक्षणांसह रुग्णांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये चिंता व नैराश्‍याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यावरही नियमित आरोग्य तपासणी आणि काळजी घेण्याची गरज असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.

अशी घ्या काळजी

  •   डिस्चार्ज मिळाल्यानंतर सात दिवस दररोज डॉक्‍टरांशी सल्लामसलत करा.
  •   दररोज ऑक्‍सिजन पातळी तपासावी. ती ९४ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असावी.
  •   खोकला आणि श्‍वास घेण्यास त्रास होत असल्यास तातडीने डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा.
  •   सुस्तपणा, आळस, बदललेल्या संवेदनांकडे लक्ष द्यावे.
  •   मधुमेहाच्या रुग्णांनी नियमितपणे रक्‍तशर्करेची तपासणी करावी आणि ती नियंत्रणात ठेवावी.
  •   उच्च रक्‍तदाब असलेल्या रुग्णांनी दर आठवड्याला रक्‍तदाबाची तपासणी करावी. त्यात अनियमितता असल्यास डॉक्‍टरांकडे जावे.
  •   फुफ्फुसाची स्थिती तपासण्यासाठी तीन महिन्यांनंतर सीटी स्कॅन करावे.


पोस्ट कोव्हिडमध्ये मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसूत्री पाळणे आवश्‍यक आहे. कोरोनामध्ये फुप्फुसावर सर्वाधिक परिणाम होतो. अनेक रुग्णालयांत पोस्ट कोव्हिड ओपीडी सुरू केली आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी तेथे डॉक्‍टरांची भेट घेत त्यांना होणाऱ्या त्रासावर योग्य उपचार घ्यावेत. शिवाय आरोग्याची काळजी घेण्याचीही आवश्‍यकता आहे.
- डॉ. रमेश भारमल,
अधिष्ठाता, नायर रुग्णालय.

Unmasking Happiness Care and treatment to be taken after discharge of covid19

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com