Unmasking Happiness | कोरोना काळात लोकसेवेचा महायज्ञ : गणेश नाईक

Unmasking Happiness | कोरोना काळात लोकसेवेचा महायज्ञ : गणेश नाईक

एकेकाळी लहानलहान गावांमध्ये विखुरलेली बेलापूरपट्टी आज देशाच्या नकाशावर नवी मुंबई शहर म्हणून ठळकपणे दिसत आहे. राहण्यायोग्य शहर, सुंदर आणि स्वच्छ शहर, नानाविध सुविधांचे शहर अशा अनेक शब्दांत या शहराचा गौरव होतो. यामध्ये सिंहाचा वाटा आहे तो आमदार गणेश नाईक यांच्या दूरदृष्टीचा. कोरोना संकटकाळातही नाईक यांनी अहोरात्र कष्ट घेत या शहराला कोरोनामुक्त करण्यासासाठी प्रयत्न केले. वेळप्रसंगी कोरोनाविरोधातील या लढाईत ते प्रत्यक्ष मैदानात उतरले. अनेकांसाठी ते आधारवड ठरले.

नवी मुंबईत कोरोना महामारीच्या काळात आमदार गणेश नाईक हे आधारवड झाले. शहरात कुणीतरी आपली काळजी घेणारे आहेत, याची जाणीव शहरवासीयांना झाली. नाईक यांनी आजाराचे गांभीर्य वेळीच ओळखून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले. वेळप्रसंगी ते प्रत्यक्ष मैदानातही उतरले.
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेसह सिडको, एमआयडीसी, महावितरण, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग यांच्यासह सरकारी, निमसरकारी आस्थापना, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधींबरोबर बैठका घेतल्या. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोरोना नियंत्रणासाठी आवश्‍यक त्या सूचना त्यांनी आस्थापनांना वेळोवेळी केल्या.

मदतीचा हात पुढे
कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाले. त्यानंतर बहुतांश आस्थापना ठप्प झाल्या. अनेकांच्या हाताचे काम हिरावले. यामुळे गोरगरीबांवरच नव्हे, तर मध्यमवर्गही हतबल झाला. या वेळी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईत मोठे मदतकार्य उभे राहिले. महामारीची भयानकता जेवढी मोठी, तेवढीच मोठी मानवताही त्यांच्यामुळे सर्वसामान्यांसाठी ठामपणे उभी राहिली. नाईक यांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनाखाली १२०० टन धान्यांचे वाटप शहरातील सर्व विभागांत करण्यात आले. तब्बल तीन लाख मास्कचे वितरण करण्यात आले. झोपडपट्टी, गावठाण, शहरी भाग, एमआयडीसी, खासगी सोसायट्या अशा सर्वच भागांत सॅनिटायझरचे वाटप झाले. रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे तब्बल १११ प्रभागात वाटप झाले. हातावर पोट असणाऱ्या हजारो बिगारी, खाण कामगार, मजूर, कारागीर, निराधार, परप्रांतीय यांच्यासाठी ‘कम्युनिटी किचन’ सुरू करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात आपल्या मूळ गावी जाण्यास निघालेल्या हजारो परप्रांतीय मजुरांना तयार अन्न, औषधे, प्रवासासाठी मदत करून त्यांना दिलासा दिला.

रेशनिंगवर सर्वांना धान्य
रेशनिंग दुकानांवर अन्नधान्य मिळवण्यासाठी रेशनिंग कार्ड आधार लिंक असणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात शेकडो नागरिकांचे रेशन कार्ड अद्याप आधार लिंक झालेले नाही. त्यामुळे या नागरिकांना शिधा मिळत नव्हता. ही अडचण लक्षात घेऊन गणेश नाईक यांनी कोकण विभागीय आयुक्त आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना १५ एप्रिल २०२० रोजी पत्र पाठवून रेशन कार्ड आधार लिंक असो किंवा नसो सर्वांना रेशनिंग पुरवण्याची मागणी केली होती. त्यानुसार आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक नाही त्यांनाही रेशनिंग दुकानांवर अन्नधान्य मिळू लागले.

...आणि एपीएमसीतील संसर्ग थांबला
एपीएमसी मार्केट आणि एमआयडीसी विभागातून कोरोना वाढत असताना एपीएमसी बंद करण्याची सूचना सर्वप्रथम नाईक यांनीच केली. त्यानंतर काही काळ एपीएमसी बंद ठेवण्यात आल्यावर नवी मुंबईतील कोरोना आकडा आटोक्‍यात आला होता. अँटीजेन टेस्ट सेंटर, निर्जंतुकीकरण अशा खबरदारीच्या उपाययोजना एपीएमसी प्रशासनाने सुरू केल्या. एमआयडीसी भागात महापालिकेने अँटीजेन टेस्ट सेंटर सुरू केले. यामध्ये नाईक यांचे मोलाचे मार्गदर्शन होते.

कोव्हिड नियंत्रणास गती
नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांबरोबर एप्रिल २०२० पासून गणेश यांनी सुमारे ३० पेक्षा अधिक कोरोना नियंत्रण आढावा बैठका घेतल्या आहेत. कोव्हिड रुग्णालये आणि कोरोना सेंटरना त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. या सर्वांचा परिणाम म्हणजे नवी मुंबईत कोरोनावर प्रभावीपणे आळा घालण्यात यश आले. कोरोना सेंटर आणि चाचण्यांची सख्या नवी मुंबईत वाढवण्यात आली, यामध्ये नाईक यांनी नेहमीच घेतलेली सकारात्मक भूमिका मोलाची आहे.

स्वतंत्र कोरोना चाचणी प्रयोगशाळा
कोरोनाचे लवकर निदान व्हावे, रुग्णांवर लवकर उपचार झाले तर रोग बळावण्याचा किंवा जीव जाण्याचा धोका कमी होतो, त्यामुळेच गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा करून दररोज १००० कोराना नमुने चाचणीची क्षमता असणारी प्रयोगशाळा उभारण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच नेरूळ येथे लॅब उभी राहिली.

कोरोनाव्यतिरिक्त रुग्णांनाही दिलासा
कोरोनाची रुग्णसंख्या कमी होऊ लागली असता सर्वसामान्यांना सर्व प्रकारच्या उपचारांसाठी आधार असलेले वाशी येथील महापालिकेचे प्रथम संदर्भ रुग्णालय नॉन कोव्हिड रुग्णालय झाले आहे. पूर्वी हे रुग्णालय केवळ कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने आरक्षित केले होते. आता या ठिकाणी सर्व प्रकारच्या रुग्णांवर उपचार होणार आहेत. त्यामुळे हजारो रुग्णांना दिलासा मिळाला होता.

सुविधांसाठी ५० लाखांचा निधी
गणेश नाईक यांनी कोरोना काळात मार्गदर्शक म्हणून मोठी भूमिका बजावली. अनेक वेळा त्यांनी त्याच्या पुढेही पाऊल टाकत सर्वसामान्य कोरोनारुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. काहींना प्रत्यक वेगवेगळ्या रूपाने मदत केली. त्यानंतर ते एवढ्यावरच न थांबता त्यांनी व्हेंटिलेटर आणि कोरोना सुरक्षा साधनांची खरेदी करण्यासाठी स्वतःच्या आमदार निधीतून ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे.

कोरोना लसीसाठी आग्रही
कोरोनाची लस बाजारात आली आहे. ही संजीवनी नवी मुंबई महापालिकेने नवी मुंबईकरांसाठी स्वखर्चाने मोफत द्यावी अशी सूचना नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेकडे केली आहे. १५ लाख लोकसंख्येसाठी १५० कोटींचा खर्च महापालिकेला करावा अशी त्यांची सूचना आहे. त्यासाठी महापालिका सक्षम आहे. एखाद्या कुटुंबात चार ते पाच सदस्य असल्यास त्यांना हा लसीचा खर्च कोरोना संकटकाळात परवडण्यासारखा नाही याची जाणीव नाईक यांना आहे. त्यामुळे त्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

ऑनलाईन शिक्षणासाठी पुढाकार
कोरोनामुळे नवी मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण थांबले होते. खासगी शाळांप्रमाणेच महापालिका शाळांमध्येदेखील हे शिक्षण सुरू करावे. कृतीपुस्तिकेच्या माध्यमातून नियमित अभ्यास घ्यावा, अशा मागण्या नाईक यांनी केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने ऑनलाईन शिक्षण सुरू केले.

शिष्यवृत्तीचे वाटप
लॉकडाऊनमुळे पालकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी शिष्यवृत्तीचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात येते. शिष्यवृत्तीची रक्कम लवकरात लवकर वितरित करून पालक व विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी नाईक यांनी केली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या खात्यावर स्कॉलरशिपची रक्कम जमा झाली.

कल्याणकारी योजनांची कामे सुरू
कोरोना काळात नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले. महापालिकेच्या वतीने दरवर्षी कल्याणकारी योजनांमधून विविध गरजू घटकांना आर्थिक मदत दिली जाते. नाईक यांनी सूचना केल्याप्रमाणे नवी मुंबई महापालिकेने या योजनांतर्गत मदत करण्याचे काम सुरू केले आहे.

खासगी डॉक्‍टरांना सुरक्षा कवच
कोरोना काळात नागरिकांना वैद्यकीय सेवा देणारे खासगी डॉक्‍टर हेदेखील कोरोना योद्धे आहेत. महापालिकेने आवाहन केल्यानंतर खासगी डॉक्‍टरांनी आपले दवाखाने उघडले होते. नवी मुंबईतील तीन डॉक्‍टरांचा करोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना महापालिकेमार्फत आर्थिक मदत मिळाली पाहिजे आणि आणि खासगी डॉक्‍टरांनादेखील विम्याचे सुरक्षा कवच मिळायला पाहिजे, अशी आग्रही मागणी नाईक यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

कोव्हिड सेंटरची संख्या वाढली
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता नवीन कोरोना सेंटर उभारण्यासाठी नाईक यांनी सातत्याने नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, नेरूळ या ठिकाणी नवीन कोव्हिड सेंटरची निर्मिती करण्यात आली.

पालकांना दिलासा
लॉकडाऊनमुळे नागरिकांची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. अशा परिस्थितीत फी वाढीसाठी जबरदस्ती करणाऱ्या शाळांवर महापालिकेने कारवाई करावी, शाळांनी केवळ शैक्षणिक शुल्कच वसूल करावे. अन्य कोणतेही शुल्क आकारू नये. शैक्षणिक शुल्कदेखील टप्प्याटप्प्याने भरण्याची सवलत पालकांना द्यावी, अशू सूचना नाईक यांनी केली होती. त्यानुसार पालिकेने परिपत्रक काढून अशा शाळांना केवळ शैक्षणिक शुल्क आकारण्याचे निर्देश दिले.

लढा सुरू राहील...
नवी मुंबईत कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यात आले आहे. गेले अनेक दिवस १०० पेक्षा कमी बाधितांचे आकडे आहेत. बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के एवढे आहे. मृतांचा आकडा अवघ्या एक ते दोनवर स्थिरावला आहे; मात्र जोपर्यंत कोरोना शून्यावर येत नाही, तोपर्यंत कोरोनाविरोधातील लढा सुरूच राहील, असा निर्धार नाईक यांनी केला आहे.

क्रमांक एकसाठी वाटचाल
गेली २५ वर्षे नवी मुंबईची एकहाती सत्ता नवी मुंबईकरांनी गणेश नाईक यांच्याकडे मोठ्या विश्‍वासाने सोपवली. या विश्‍वासाला पात्र ठरत त्यांनी या शहराच्या विकासाला आकार आणि उकार दिला. देशातील राहण्यायोग्य आघाडीचे शहर, दळणवळणाच्या सक्षम सुविधा, मोरबे धरणामुळे पाणीपुरवठ्यात स्वयंपूर्ण, आधुनिक डम्पिंग ग्राऊंड, मलनिःसारण केंद्रे, पर्यावरणपूरक परिवहन सेवा, थीम पार्क, उद्यानांची हिरवाई आदी कामांमुळे अन्य शहरांच्या तुलनेत नवी मुंबई उजवी आहे. मागील वर्षी केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात चार हजार शहरांमधून नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला. यंदा पहिल्या क्रमांकाच्या दिशेने या शहराची वाटचाल सुरू आहे.

कुणी तरी आहे काळजी घेणारे...
कोरोना सेंटरमध्ये दाखल झालेल्या आपल्या आप्तस्वकीयांवर आपुलकीचे योग्य ते उपचार होतील. तो बरा होऊन घरी परतेल, अशी आशा त्याच्या नातेवाईकांना असते, परंतु अनेक वेळा कोरोना सेंटरमधून रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी समोर येतात. अशा तक्रारी नवी मुंबईतून आल्यानंतर नाईक यांनी कोरोना रुग्णांना सातत्याने नजरेखाली ठेवण्याची गरज व्यक्त केली. विशेषतः ‘हायरिस्क’ असलेल्या ज्येष्ठ नागरिकांकरिता स्वतंत्र ‘मॉनिटरिंग’ व्यवस्था असायलाच हवी असा आग्रह त्यांनी धरला. तसा सल्ला महापालिका प्रशासनाला दिला. त्यांच्या सूचनेनुसार कोरोना रुग्णांच्या तब्येतीची दररोज माहिती घेण्यासाठी व त्यांची विचारपूस करण्यासाठी महापालिकेने कॉल सेंटर सुरू केले. उपलब्ध खाटांची माहिती मिळण्यासाठी संकेतस्थळ सुरू केले. हेल्पलाईन नंबर सुरू केले.

कोरोना महामारीचा अंत करण्यासाठी केवळ निर्धार पुरेसा नसून मास्क वापरणे, हात निर्जंतुकीकरण करणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही खबरदारी पाळली पाहिजे. कोरोनामुळे आपण गमावलेले आपले प्रियजन आणि रुग्णसेवा करताना प्राणांची आहुती दिलेले कोव्हिडयोद्धे यांची आठवण आपल्या मनात राहीलच. यापुढेही धीरोदात्तपणे आपल्याला या संकटाचा सामना करून ही आपत्ती नाहीशी करायची आहे.

- गणेश नाईक,
आमदार

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Unmasking Happiness Mahayagya of public service in Corona period by Ganesh Naik navi mumbai marathi update
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com