मुंबई पोलिसांच्या कोरोना मृत्यूदराबाबत दिलासादायक अपडेट; परंतु राज्यातील परिस्थिती चिंताजनकच

अनिश पाटील
Sunday, 13 September 2020

मुंबई पोलिसांसाठी ही बाब सकारात्मक असली, तरी राज्य पोलिस दलातील इतर विभागांतील वाढता फैलाव  दलासाठी चिंतेची बाब आहे. 

मुंबई :  मुंबई पोलिस दलातील मृत्यूचे प्रमाण तुलनेने आता कमी होत आहे. मुंबई पोलिसांसाठी ही बाब सकारात्मक असली, तरी राज्य पोलिस दलातील इतर विभागांतील वाढता फैलाव  दलासाठी चिंतेची बाब आहे. 

कोरोना संकटात सर्वाधित फटका मुंबई पोलिस दलाला बसला.  पण गेल्या काही दिवसांमध्ये या दलातील मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी झालेले दिसून आले आहे. एप्रिलमध्ये  राज्यातील एकूण मृत पोलिसांमधील सुमारे 70 टक्के पोलिस मुंबई पोलिस दलातील होते. तुलनेने त्यात आता घट झाली आहे.  सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर ते सुमारे 38 टक्क्यांवर पोहोचले आहे. मुंबई पोलिस दलासाठी ही बाब आशादायक असली, तरी राज्यातील इतर विभागांमधील मृत्यूच्या प्रमाणात झालेली वाढीवर वेळीच उपाय योजना करणे आवश्यक आहे.

३६ मिनिटांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वाचा सविस्तर

राज्य पोलिस दलाच्या आकडेवारीनुसार, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात 107 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यातील 51 टक्के म्हणजे 55 मृत पोलिस मुंबई पोलिस दलातील होते. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे प्रमाण 44 टक्क्यांवर आले आहे, तर 10 सप्टेंबरला हे प्रमाण 38 टक्क्यांवर पोहोचले होते.
दुसरीकडे राज्यातील ग्रामीण विभागातील पोलिसांमध्ये कोरोनामुळे पोलिसांचे मृत्यू चितेंचे विषय ठरत आहे. बीड, कोल्हापूर, चंद्रपूर, बुलढाणा या जिल्ह्यांतही ऑगस्टमध्ये कोरोनामुळे पोलिसांचे मृत्यू झाले. ही बाब राज्य पोलिस दलासाठी चिंतेची आहे. याशिवाय राज्य राखीव पोलिस दलाच्या विविध तुकड्यांमध्येही ऑगस्ट महिन्यात पोलिसांचे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत.
जुलै महिन्यात मुंबई पोलिस दलातील कोरोनाबाधीत पोलिसांवर अभ्यासपूर्ण सर्वेक्षण करण्यात आले असून त्यात मुंबई पोलिस दलासाठी काही शिफारसी करण्यात आल्या होत्या. त्यात शारिरीक तंदुरुस्तीतील कमतरता हे मृत्यूचे प्रमुख कारण असल्याचे नमुद करण्यात आले होते. याशिवाय मुंबईतील सशस्त्र पोलिस दलात कोरोनाचे प्रमाण अधिक असतानाही वाहतूक पोलिस दलातील मृतांचे प्रमाण अधिक होते.

मारहाणीचे राऊतांकडून समर्थन, हा बेशरमपणाचा कळस भातखळकर यांची टीका

सशस्त्र पोलिस दलात तरुणांची संख्या अधिक असल्यामुळे त्यांनी लवकर कोरोनावर मात केले. तुलनेत वाहतूक पोलिस दलात 40 वर्षांपुढील वयोगटातील पोलिसांची अधिक संख्या असल्याने  मृतांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अधिक जोखमीची कामे  तरुणांना अधिक द्यावी,  35 ते 40 वर्षांवरील पोलिसांना अधिक जोखमेचे व कमी जोखिमीची कामे आलटून पालटून द्यावी. विषाणू संपर्क क्षेत्रातील ड्युटीनंतर  प्रकृती सुधारण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा विश्रांती कालावधी देणे आवश्यक असल्याची शिफारस करण्यात आली होती. तसेच वाहतूक पोलिसांचे त्रासदायक काम लक्षात घेता तेथे तरुण पोलिसांची नियुक्ती करावी, अशी शिफारही या सर्वेक्षणात करण्यात आहे. त्यानुसार मुंबई पोलिसांनी काही बदल केले होते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: update on Mumbai Polices corona death toll