esakal | स्थानिक वाहतूकदार अडचणीत; काम न देण्याच्या भूमिकेमुळे तरुण बेरोजगार
sakal

बोलून बातमी शोधा

JNPT

स्थानिक वाहतूकदार अडचणीत; काम न देण्याच्या भूमिकेमुळे तरुण बेरोजगार

sakal_logo
By
सुभाष कडू

उरण : जेएनपीटी बंदरातील (JNPT Port) कंटेनर ने-आण करण्यासाठी हजारो ट्रेलरची आवश्यकता लागत असते. आता फक्त ६०० च्या आसपास कंटेनर ट्रेलर (container trailer) शिल्लक आहेत. यामागे मोठे षडयंत्र असून स्थानिक वाहतूकदारांना (local transport) पूर्णपणे नामशेष करण्याचा डाव आहे. हा डाव उधळून लावण्यासाठी आपले अस्तित्व टिकावे, यासाठी स्थानिक ट्रेलर वाहतूकदारांनी एकजूट होणे काळाची गरज निर्माण झाली आहे.
उरणमधील सीएफएस मालक बाहेरील उपऱ्या ट्रान्सपोर्टसना वाहतुकीचे काम देतात.

हेही वाचा: मुंबई विद्यापीठाची सिनेट वादळी ठरणार?

स्थानिक वाहतूकदारांना डावलत आहेत. यापूर्वी स्थानिक वाहतूकदारांचे जवळपास १२०० कंटेनर ट्रेलर होते; परंतु सीएफएस मालकांच्या स्थानिक ट्रेलर वाहतूकदारांना काम न देण्याच्या भूमिकेमुळे अनेकांनी ट्रेलर विकले आणि काही ट्रेलर कर्जाचे हप्ते न फेडता आल्याने बँकांकडे जमा झाले आहेत. ट्रान्सपोर्टचे काम न देणाऱ्या, सापत्नपणाची वागणूक देणाऱ्या, उपऱ्या ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या सीएफएसविरोधात स्थानिक ट्रेलर वाहतूकदारांना त्यांचे हक्क मिळवून देण्याची गरज निर्माण झाली आहे.

बेरोजगार तरुणांना नोकऱ्या न मिळाल्याने अनेक तरुणांनी बँकांची कर्जे काढून कंटेनर वाहतुकीच्या व्यवसायासाठी ट्रेलर घेत व्यवसाय सुरू केला. परंतु, सीएफएसकडून स्थानिकांना डावलून बाहेरील उपऱ्या ट्रान्सपोर्टना वाहतुकीचे काम दिले जाते. काही सीएफएस स्वतःचेच ट्रेलर वापरतात. यामुळे अनेक स्थानिक ट्रेलर वाहतूकदारांना कंटेनर वाहतुकीचे काम मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत असल्याने ते त्रस्त आहेत.

हेही वाचा: नवी मुंबई : सिडकोकडून गुंतवणुकीची द्वारे खुली

अनेक स्थानिक तरुण वाहतूकदारांना कर्जाचे हप्ते न फेडता आल्याने त्यांचे ट्रेलर फायनान्स कंपन्यांनी खेचून नेले. परिणामी, पुन्हा तरुण बेरोजगार होत आहेत. त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. याबाबत अनेक तक्रारी भाजप ट्रान्सपोर्ट सेलकडे आल्या आहेत. त्यामुळे हा अन्याय सहन करण्यापलीकडे असून, याबाबत लक्ष घालणार असून वेळ आली, तर आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. स्थानिकांची ताकद काय असते, हे दाखवून देण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून लढा उभारणार, असा इशाराच भाजप ट्रान्सपोर्ट सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर घरत यांनी सीएफएस मालकांना दिला आहे.

तर लढा उभारणार

जेएनपीटीच्या अनुषंगाने जवळपास ३३ सीएफएस व लहान मोठे असे ५० पेक्षा जास्त खासगी गोदामे आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी उरण तालुक्यातील स्थानिक ट्रेलर वाहतूकदारांसाठी एकूण कामांपैकी ४० टक्के वाहतुकीचे काम मिळायलाच पाहिजे. यासाठी सर्व सीएफएस व्यवस्थापनासोबत चर्चा केली जाईल. सहकार्याची अपेक्षा असून चर्चेतून मार्ग निघावा; अन्यथा जेसीएफएस / गोडावून्स व्यवस्थापन स्थानिक ट्रेलर वाहतूकदारांसाठी ४० टक्के व्यवसाय राखीव ठेवणार नाहीत. यासाठी वेळप्रसंगी त्यांच्या गेटसमोर चक्काजाम आंदोलन करून स्थानिक ट्रेलर वाहतूकदारांसाठी भाजप ट्रान्सपोर्ट सेल लढा उभारणार आहे.

दृष्टिक्षेप

- स्थानिक ट्रेलर वाहतूकदारांना ४० टक्के व्यवसाय मिळायलाच पाहिजे.
- सीएफएसने मनमानी केल्यास गेटसमोरच चक्काजाम आंदोलन
- स्थानिक ट्रेलर वाहतूकदारांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार

loading image
go to top