लोकलमध्ये मास्क वापरा, कोरोना टाळा! संसर्ग 99 टक्‍क्‍यांनी कमी होत असल्याचा तज्ज्ञांचा दावा

भाग्यश्री भुवड
Friday, 30 October 2020

लोकलमध्ये प्रवास करताना प्रत्येकाने मास्क वापरले तर कोरोना संसर्ग 99 टक्‍क्‍यांनी कमी होतो, असा दावा मुंबईतील वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे.

मुंबई : लोकलमध्ये प्रवास करताना प्रत्येकाने मास्क वापरले तर कोरोना संसर्ग 99 टक्‍क्‍यांनी कमी होतो, असा दावा मुंबईतील वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे. सध्या मुंबईतील कोव्हिड रुग्णांचा वाढता आलेख खाली येत आहे, ही दिलासादायक बाब असून, सर्वांनी मास्क वापरा व स्वस्थ राहा, असा सल्लाही दिला आहे. 

 

बाहेर फिरताना सामाजिक अंतराविषयीचे नियम पाळले तर कोरोनासोबत लढायला सोपे होईल. सध्याच्या परिस्थितीत आढळणारे रुग्ण अजून कमी झाले तर पुढच्या दोन आठवड्यांत लोकलची सुविधा उपलब्ध करून देणे सोपे होईल; मात्र कोणतीही खबरदारी घेतली गेली नाही तर ही परिस्थिती हाताबाहेरही जाऊ शकते, अशीही भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली. 

 

सोशल व्हॅक्‍सिन म्हणजेच फेस मास्क वापरणे. एक मीटरपर्यंत सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझर आणि हॅंड वॉशचा वापर करणे हीच कोरोनावरील सध्याची लस आहे. दुसरीकडे लोकलमधील गर्दी पाहता तिथे सामाजिक अंतराविषयीचे नियम पाळणे सोपे होणार नाही. त्यामुळे किमान मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. सर्व मास्क लावत असतील तर संसर्ग पसरण्याचा धोका 99 टक्‍क्‍यांपर्यंत कमी होतो. 
- डॉ. शशांक जोशी,
सदस्य, टास्क फोर्स समिती 

 

मुंबईतील लोकल या एसी नसल्याने तिथेही संसर्ग होण्याचे प्रमाण कमी आहे. पालिकेने केलेल्या एका अभ्यासातून असे समोर आले की, न्यूयॉर्कसारखीच मुंबईतील बऱ्याचशा लोकांमध्ये उच्च दर्जाच्या कोव्हिडविरोधातील अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. मुंबईच्या 30 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या असतील. शिवाय इतर अनेक लोकांचा या व्हायरसशी सामना झालेला असेल तर संसर्गाचा धोका कमी असू शकतो. फक्त व्हायरसचा संसर्ग घरातील ज्येष्ठ नागरिकांना होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. 
- सुरेश काकाणी,
अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) 

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use masks locally avoid corona Experts claim that the infection is reduced by 99 percent