मास्क वापरल्यामुळे कोरोनाचा धोका होतो कमी; मुंबई आयआयटीचे सर्वेक्षण

मास्क वापरल्यामुळे कोरोनाचा धोका होतो कमी; मुंबई आयआयटीचे सर्वेक्षण


मुंबई - मास्कमुळे रूग्णाच्या तोंडातून येणार्या कोव्हिडच्या तुषारांच्या आकारावर मर्यादा येते त्यामुळे, मास्क चा वापर करणे गरजेचे असल्याचे आय आयटी मुंबईचे सर्वेक्षण आहे. 

खोकताना किंवा शिंकताना नेहमी तोंड आणि नाकाजवळ रूमाल धरावा, असं सांगितलं जातं. आता तर कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी म्हणून मास्क वापरणंच बंधनकारक करण्यात आलं आहे. मास्क वापरण्याचा सल्ला वारंवार दिला जातो. मात्र काही जणांना अजूनही मास्कचं महत्त्व पटलेलं नाही. मास्क घातला नाही तर किती मोठा धोका उद्भवू शकतो, हे नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून दिसून आलं आहे.

कोरोना संक्रमण रोखण्यात मास्क महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे आयआयटी मुंबईच्या एका संशोधनातून सिद्ध झाले आहे. मास्क लावल्याने कोविड कफ क्लाउड्स म्हणजेच शिंक किंवा खोकल्याद्वारे पसरणारे कोरोनाचे तुषार पसरण्यावर 7 ते 23 टक्क्यांपर्यत नियंत्रण येते. त्यामुळे कोरोनाचा फैलाव आणि संक्रमण रोखण्यास मदत होते.

रुमाल ही फायदेशीर-

त्याचप्रमाणे रुमाल वापरण्याचा फायदा होत असल्याचे दिसून आले आहे. रुमाल वापरण्यानेही विषाणूंचा फैलाव रोखण्यास मदत होत असल्याचे, आयआयटी मुंबईचे प्रोफेसर अमित अग्रवाल आणि रजनीश भारद्वाज यांनी सांगितले. या दोघांचे हे संशोधन अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्सच्या फिजिक्स ऑफ फ्लूड्स जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

काय आहे संशोधन ?

एखादी व्यक्ती खोकली किंवा शिंकली तर त्यातून निर्माण होणारा कफ क्लाऊड म्हणजेच तोंडातील ड्रॉपलेट्स बाहेर पडून हवेत तयार होणारा त्यांचा समूह हा मास्क न वापरल्यास 23 पटींनी घातक ठरतो आणि मास्क वापरला तर 23 पटींनी कमी होतो, असं या संशोधनात दिसून आलं. 

संशोधक अमित अग्रवाल आणि रजनीश भारद्वाज यांना असं आढळलं की, मास्क न लावता खोकल्यामुळे तयार होणार कफ क्लाऊड हा सर्जिकल मास्क वापरल्यानंतर तयार होणाऱ्या कफ क्लाउडच्या तुलनेत 7 पटींनी आणि N95 मास्कच्या तुलनेत 23 पट अधिक आहे. कोणत्याही व्यक्तीच्या संरक्षणासाठी तयार केलेल्या मास्कमुळे हवेतील सूक्ष्मातील सूक्ष्म कण त्याच्या श्वासोच्छवासात जाऊ नयेत हाच उद्देश असतो. मास्क लावला असला किंवा नसला तरीही हा कफ क्लाउड पाच ते आठ सेकंद हवेत राहतो आणि त्यानंतर तो पसरतो असं निरीक्षणही या अभ्यासात मांडण्यात आलं आहे. 

महामारीच्या प्रसाराची कारणं शोधण्याच्या दृष्टिने खोकताना किंवा शिंकताना नाक आणि तोंडावाटेबाहेर पडणारी हवा आणि ती आजूबाजूच्या हवेत मिसळणं हे कसं घडतं हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असं या संशोधकांनी म्हटलं आहे. खोकला किंवा शिंकल्यानंतर श्वासोच्छवासातून बाहेर पडलेले कण प्रसारित होण्याच्या दृष्टिने पहिली पाच ते आठ सेकंदं अत्यंत महत्त्वाची आहेत असंही त्यांचं मत आहे. खोकल्यानंतर बाहेर पडलेल्या शिंतोड्यांच्या तुलनेत कफ क्लाऊडचा आकार 23 पट अधिक असतो अशी माहिती संशोधक अमित अग्रवाल यांनी दिली आहे. 

कफ क्लाऊड शोधण्यासाठीही नवा फॉर्म्युला -
मास्क वापरल्यामुळे कफ क्लाउड निर्माण होण्याच्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात घट होते आणि त्यामुळेच संसर्गाचा धोका कमी होतो. शर्टच्या बाहीवर किंवा हाताच्या कोपऱ्यात शिंकणं आणि हातरुमाल वापरणं यामुळे कफ क्लाउडच्या प्रवासाचं अंतर खूप कमी होतं आणि त्यामुळे बाहेर पडणाऱ्या शिंतोड्यांचं आकारमानही कमी होतं त्याने विषाणूचा संसर्ग रोखला जातो. हवेतील कफ क्लाऊड शोधण्यासाठीही आयआयटी मुंबईच्या पथकाने संशोधन करून फॉर्म्युला तयार केला आहे. या फॉर्म्युल्यामुळे रुग्णालयातील वॉर्डमध्ये रुग्णांची संख्या निश्चित करण्यासाठी मदत होणार आहे, असे संशोधक रजनीश भारद्वाज यांनी सांगितले आहे. 

तसेच, एखाद्या कक्षात, सिनेमागृहात, कार आणि बसेस, एसी किती वेळ लावू शकतो, पंखा किती वेळ लावून ठेऊ शकतो, शिवाय, एअरक्राफ्टमध्ये हवा खेळती ठेवण्यास मदत होणार आहे. त्यामुळे, कोरोना विषाणू पसरण्याचा आणि कोरोना संक्रमणाचा धोका कमी होणार आहे, असे संशोधकांनी सांगितले.

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com