भाजप नेता म्हणतो, कमळाच बटन दाबा, पाकिस्तानात अणुबॉम्ब पडेल 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

‘प्रत्येकाने आपल्या आप्तांनाही भाजपलाच मतदान करण्यास सांगायला हवे. मतदान इतक्या मोठय़ा प्रमाणावर व्हायला हवे की मतदान यंत्र हे कमळाच्या चिन्हानेच भरून गेले पाहिजे भाजपला मोठय़ा प्रमाणात मतदान झाले तर काँग्रेस पुन्हा मतदान यंत्राला दोष देईल.

ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारण ढवळून निघालेले आहे. उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांनी आता प्रचारालाही सुरुवात केली आहे. भाजपने राज्य नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना प्राचारासाठी राज्यात बोलावले आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सध्या प्रचारानिमित्त महाराष्ट्रात आहेत.

ठाण्यातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारनिमित्त बोलताना मौर्य यांनी गेल्या 70 वर्षांपासून देशाला कीड लागली होती, ती दूर करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. कलम 370 ही त्यापैकी एक कीड होती. तसेच पाकिस्तान सातत्याने अणुबॉम्बच्या धमक्या देत आहे. त्याला चोख उत्तर देण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कमळाचे बटण दाबले तर अणुबॉम्ब थेट पाकिस्तानात आणि कलम 370ला विरोध करणाऱ्यांवरही पडेल, असं मौर्य म्हणाले आहेत.

पुढे बोलताना मौर्य यांनी ‘प्रत्येकाने आपल्या आप्तांनाही भाजपलाच मतदान करण्यास सांगायला हवे. मतदान इतक्या मोठय़ा प्रमाणावर व्हायला हवे की मतदान यंत्र हे कमळाच्या चिन्हानेच भरून गेले पाहिजे. भाजपला मोठय़ा प्रमाणात मतदान झाले तर काँग्रेस पुन्हा मतदान यंत्राला दोष देईल, असा टोलाही मौर्य यांनी काँग्रेसला लगावला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांच्या भाजपच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. तसेच या यादीत चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, आशीष शेलार, रणजीत पाटील, विजयराव पुराणिक, पूनम महाजन-राव, विजया रहाटकर, माधवी नाईक, सुजितसिंग ठाकूर, पाशा पटेल, भाई गिरकर, प्रसाद लाड यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uttar Pradesh Dy CM Keshav Prasad Maurya says vote to BJP