उत्तराखंडचा नैसर्गिक प्रकोप मानवाला इशारा! सावध व्हा, अन्यथा विनाश अटळ

उत्तराखंडचा नैसर्गिक प्रकोप मानवाला इशारा! सावध व्हा, अन्यथा विनाश अटळ

उत्तराखंडातील चामोली जिल्ह्यात हिमालयातील हिमकडा कोसळल्यामुळे मोठा प्रलय काही दिवसांपूर्वी जगाने पाहिला. या नैसर्गिक दुर्घटनेत आर्थिक आणि जीवित हानी झाली. या दुर्घटनेमागची कारणंं काय? याचा साऱ्या जगभरातील पर्यावरण आणि भुगोल तज्ज्ञ अभ्यास करीत आहे. या घटना उत्तराखंडामध्ये नवीन नाहीत परंतु या घटना नैसर्गिक आहे का? जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वार्मिंग) मुळे होत आहेत का? ग्लोबल वर्मिंगचा वेग वाढलाय का? हा वेग असाच राहिला तर, त्याचा हिमालयावर काय परिणाम होईल? असे अनेक विषय आता चर्चिले जात आहेत. निसर्गाच्या मुळ रुपाशी होणारी छेडछाड या दूर्घटनांना जबाबदार आहे का? याचाही अभ्यास होणं आता गरजेचं झालं आहे. 

उत्तराखंडमधील हिमकडा कोसळल्याने धौलिगंगा नदीच्या पाणी पातळीत कमीवेळात महापूराएवढी वाढ झाली. अचानक झालेल्या हिमस्खलनामुळे नदीवरचे धरणही फुटले आणि त्यानंतर आलेल्या महापूरात होत्याचं नव्हतं झालं. अनेक घरे वाहून गेली. असंख्य जण बेपत्ता आहेत. मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली. समोर आलेल्या दृश्यांमधून निसर्गाचं तांडव किती भयानक होतं याची कल्पना येते. 

ग्लोबल वार्मिगचा धोका!

जागतिक तापमान वाढीचा वेग आपण थांबवू शकलो नाही, त्यामुळे या घटना घडत आहे. चामोली जिल्ह्यात झालेल्या हिमस्खलनामुळे ग्लोबल वार्मिंगचा धोका आणखी गडद आणि स्पष्ट दिसत आहे. जगभरात वाढत असलेलं औद्योगिकरण आणि वाढत्या प्रदुषणामुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. यामुळे आर्टिक, अंटार्टिकासह हिमालय देखील वितळू लागला आहे. ICMOD या संस्थेने तयार केलेल्या अहवालामध्ये जगाचं तापमान 1.5 डिग्री सेल्सियसने वाढवल्यास सन 2100  पर्यंत जगातला 40 टक्के बर्फ वितळणार असल्याचा अंदाज आहे.  हे तापमान 1.5  डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त वाढल्यास सन 2100 पर्यंत जगातील 70 टक्के बर्फ वितळू शकतो. प्रदुषणामुळे हिमनद्यांवर कार्बन साचतो. त्यामुळे बर्फ वेगाने वितळतोय. हवामान बदलामुळे फक्त डोंगराळ प्रदेशातच हानी होईल असे नाही. तर नद्यांच्या मैदानी प्रदेशात अचानक महापूर येणे, पीके नष्ट होणे अशा घटना घडू शकतात.

तापमान वाढीमुळे तिन्ही धृव हे वरच्यावर बर्फमुक्त होतात. याठिकाणी भुसभूशीत बर्फही असतो आणि टणक बर्फ ही असतो. साधारण 5 -5 किलोमीटरपर्यंत या बर्फाचा थर असण्याचा अंदाज आहे. 2020 मध्ये 700 अब्ज टनाचा हिमखंड कोसळला होता. तर जगाच्या पाणी पातळीत 2.3 मिलिमीटरची वाढ झाली होती. 

ग्लोबल वार्मिंगचा हिमालयाला धोका!

  • हिमालय पर्वत तब्बल 3500 किलोमीटर परिसरात व्यापला आहे,
  • पर्वतमय भागात राहणाऱ्या लोकांवर हवामान बदलाचे परिणाम होणार
  • मान्सून पूर्व काळात नद्यांचे प्रवाह आटणार
  • मान्सूनमध्ये बदल होऊन शहरांच्या जलपुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार
  • अन्न आणि ऊर्जा निर्मितीचा समतोल बिघडण्याची भीती

उत्तराखंडमध्ये झालेल्या हिमस्खलनाचं एक कारण चामोली येथे सुरू असलेला जलविद्युत प्रकल्प देखील असल्याचे बोलले जात आहे. जलविद्युत प्रकल्पांसाठी जंगले तोडली जात आहेत. नद्यांचे प्रवाह बदलेले किंवा अडवले जात आहेत. निसर्गाशी छेडछाड केल्याने त्यांची परिणीती अशा घटनांमध्ये होत आहे. उत्तराखंडमध्ये तब्बल 86 छोटेमोठे जलविद्युत प्रकल्प उभारले गेले. पाण्याच्या प्रचंड साठ्यामुळे भूभागावर दाब पडतो. त्यातच हिमालयातील जमीन नाजूक आहे. त्यातच हिमालयाखालचे भूपृष्ठ अजूनही स्थिर नसल्याने येथे अधूनमधू भूस्खलन होत असते. 

 उत्तराखंडचा भूभाग अतिशय नाजूक समजला जातो. हिमालयातील खडक अतिशय ठिसूळ आहेत. तिथे भूस्खलन होतंच असतं. त्यात भरात भर म्हणून, जलविद्युत प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरू केले होते. त्यासाठी मोठ्याप्रमाणात वृक्षतोड झाली.  ते करू नका असे भारतासह जगभरातील शास्त्रज्ञ सांगत होते. हे प्रकल्प उभे करतांना जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात सुरूंग लावले जात असत. तिथला खडक आधीच कमकुवत आहे. त्यामुळे या प्रकल्पांमुळे हिमालयात अशा आपत्ती वारंवार घडत राहतील. 

- अतुल देऊळगावकर , पर्यावरण तज्ज्ञ

देवभूमी उत्तराखंडमध्ये अवघ्या 7 वर्षात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मानवाला धोक्याचा इशारा दिला आहे. निसर्गाने दिलेले संकेत आपण आतातरी विचारात घेणार आहोत की,  अजूनही पर्यावरणाची हानी आपण करीत राहणार आहोत. या सगळ्यांंचा विचार करण्याची हीच वेळ आहे. अन्यथा नजिकच्या भविष्यात विनाश अटळ आहे..

-------------------------------------------------------------

uttarakhand disaster marathi news Natural calamity of Uttarakhand warns man special news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com