वडार भवन समाजाचे उद्‌धार केंद्र ठरेल!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

सानपाडा येथील वडार भवन हे समाजाचे उद्धार करणारे केंद्रबिंदू ठरेल, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. गुरुवारी (ता.२५) उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडार भवनाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान ते बोलत होते. 

नवी मुंबई : सानपाडा येथील वडार भवन हे समाजाचे उद्धार करणारे केंद्रबिंदू ठरेल, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. गुरुवारी (ता.२५) उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडार भवनाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान ते बोलत होते. 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट, लढवय्या आणि धाडसी शिवसैनिक असणारा विजय चौगुले यांनी उभारलेल्या या इमारतीवर माझा अजूनही विश्‍वास बसत नाही. मात्र बाळासाहेब आज असते तर त्यांना नक्कीच अभिमान वाटला असता, असे भावनिक उद्‌गार काढत वडार भवन आणि वडार समाज समन्वय समितीचे अध्यक्ष विजय चौगुले यांचे ठाकरे यांनी कौतुक केले.

आपल्या देशात विविध चमत्कार करून दाखवणारे गुणवंत विद्यार्थी आहेत. परंतु त्यांना योग्य वेळी पाठिंबा मिळाला नाही, तर असे गुणवंत विद्यार्थी वाया जातात. मात्र चौगुलेंसारख्या मंडळींनी अशा विद्यार्थ्यांना हात दिल्याने समाजाचा विकास होत आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. हे भवन म्हणजे देशातील पहिले वडार समाजाचे भवन असल्याने ते समाजाचे केंद्रबिंदू ठरणार असल्याचे सुतोवाच ठाकरे यांनी या वेळी केले. पुढे आपलेच सरकार येणार आहे. हे सरकार वडार समाजाच्या विकासासाठी ताकदीने पाठीशी उभे राहील, असे आश्‍वासन ठाकरे यांनी दिले. 

ज्या वडार समाजाने खऱ्या अर्थाने निर्माणाचे कार्य केले, मोठ-मोठ्या इमारती, राजवाडे तयार केले, जो हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आपण दाखवतो, त्या इतिहासाची निर्मिती करण्याचे महत्त्वाचे काम वडार समाजाने केल्याचे गौरावोद्‌गार देवेंद्र फडणवीस यांनी काढले. त्या वडार समाजाच्या उद्धाराकरिता चौगुले यांच्यामार्फत हे वडार भवन तयार करण्यात आले आहे. वडार समाजासाठी आज आनंदाचा दिवस आहे. हे वडार भवन पाहिल्यानंतर; तसेच समाजातील पाच वतनांचा सत्कार केल्याची संधी मिळाल्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. या प्रसंगी वडार समाजातील पाच गुणवंतांचा ठाकरे आणि फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

सरकार समाजाच्या पाठीशी
हे भवन देशातील पहिले वडार समाजाचे भवन असल्याने ते समाजाचे केंद्रबिंदू ठरणार असल्याचे सूतोवाच ठाकरे यांनी या वेळी केले. पुढे आपलेच सरकार येणार आहे. हे सरकार वडार समाजाच्या विकासासाठी ताकदीने पाठीशी उभे राहील, असेही आश्‍वासन ठाकरे यांनी यावेळी दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vadar Bhawan will be the imploration center of the community!