मांस, मटणविक्री तात्पुरते बंद ठेवणे वैध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

मुंबई:  एखाद्या विशिष्ट समुदायाच्या भावनांसाठी कत्तलखाने आणि मटणविक्री अल्प काळासाठी बंद ठेवणे अयोग्य नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे जैन धर्मीयांच्या येत्या पर्यूषण पर्व काळात मांसविक्री बंद राहण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई:  एखाद्या विशिष्ट समुदायाच्या भावनांसाठी कत्तलखाने आणि मटणविक्री अल्प काळासाठी बंद ठेवणे अयोग्य नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे जैन धर्मीयांच्या येत्या पर्यूषण पर्व काळात मांसविक्री बंद राहण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई आणि मिरा-भाईंदर या महापालिकांनी जैन धर्मीयांच्या पर्यूषण पर्व काळात चार ते 10 दिवस कत्तलखाने आणि मटणविक्री बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय चार वर्षांपूर्वीच घेण्यात आला होता. याबाबतचे परिपत्रक कत्तलखाने आणि मटणविक्री दुकानांना पाठवण्यात आले होते. या परिपत्रकाला बॉम्बे मटण डीलर्स असोसिएशनने याचिकेद्वारे विरोध केला आहे. 

या याचिकेवर बुधवारी मुख्य न्यायाधीश प्रदीप नंदराजोग आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. महापालिकेच्या परिपत्रकामुळे आमच्या उपजीविकेच्या मूलभूत अधिकारांना बाधा येत आहे; त्यामुळे या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकादारांनी केली. हा युक्तिवाद खंडपीठाने अमान्य केला. एखाद्या विशिष्ट समुदायाच्या भावनांचा विचार करून कत्तलखाने व मटणविक्री अल्प काळासाठी बंद ठेवणे अवैध ठरणार नाही, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयाचा दाखलाही खंडपीठाने दिला. अहमदाबाद महापालिकेने काढलेल्या अशा प्रकारच्या परिपत्रकावर सर्वोच्च न्यायालयाने संबंधित निर्णय दिला होता. अशा प्रकारे काही काळ दुकाने बंद ठेवणे बेकायदा नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात खंडपीठाने याचिकादारांना दिलासा देण्यास नकार दिला. या याचिकेतील मुद्द्याबाबत लवकरच सविस्तर सुनावणी घेण्याचे उच्च न्यायालयाने निश्‍चित केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Valid for temporarily stopping the sale of meat, mutton