नवी मुंबईतील खवय्यांना विविध खाद्यपदार्थांची पर्वणी

 खवय्यांना विविध खाद्यपदार्थांची पर्वणी
खवय्यांना विविध खाद्यपदार्थांची पर्वणी

नवी मुंबई : राज्याच्या विविध भागांतील खाद्यपदार्थ, गावातील महिलांनी व आदिवासी कारागीरांनी बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तू व फक्त गावातच मिळणाऱ्या अस्सल पारंपरिक गोष्टी नवी मुंबईकरांना उपलब्ध झाल्या आहेत. नवी मुंबईतील नेरूळमधील पाम बीच रोडजवळील सेक्‍टर २४ येथील आगरी कोळी संस्कृती भवनामध्ये २१ ते ३० ऑगस्टदरम्यान अतिरिक्त महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात १२० स्टॉल मांडण्यात आले आहेत. त्यातील २० स्टॉल खाद्यपदार्थांचे असणार आहेत. त्यामुळे हौशी खवय्यांचे याकडे लक्ष लागले आहे. 

अत्यंत नाविन्यपूर्ण, लक्षवेधी व ग्रामीण संस्कृतीला शहरापर्यंत पोहचविणारे अनोखे व्यासपीठ म्हणून या प्रदर्शनाची ओळख निर्माण झाली आहे. सदर प्रदर्शनामध्ये राज्यातील ३४ जिल्हे व ३५१ तालुक्‍यांतील विविध स्वयंसहायता गट व ग्रामीण कारागीर सहभागी झाले आहेत. पालघरपासून बीड, अमरावती, सातारा, विदर्भ, मराठवाडा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, उस्मानाबाद तसेच केरळ, पश्‍चिम बंगाल आदी राज्यांमधील स्वयंसहायता गटांचा यात समावेश आहे. या विविध प्रांतातून आलेल्या खाद्यपदार्थांची अस्सल व गावरान चव चाखण्यासाठी येथील स्टॉलला भेट द्यायलाच हवी. येथे मिळणाऱ्या हुरड्याचे थालीपीठ, तांबडा-पांढरा रस्सा, खेकडा सूप, गव्हाचे मांडे, वांग्याचे भरीत, कुरकुरीत कांदा भजी, खीर आदी पदार्थांचे कौतुक अनेकजण करत आहेत.  

सकाळी १० ते रात्री १० पर्यंत सुरू असलेल्या या प्रदर्शनाला सर्व नागरिकांना मोफत प्रवेश असेल. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही असणार आहे. यात अनुक्रमे नृत्याविष्कार, सुरसिंगार, सप्तरंग, स्वर उमेद, रंगोफार, रिंक नारकर लाईव्ह, बॉलीवूड इव्हनिंग, नेचर के बंदे, नवरंग हे कार्यक्रम असतील. ग्रामीण भागातील स्वयंसहायता गटातील महिलांचा उत्साह वाढावा व त्यांना गरिबीतून बाहेर पडण्यासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी नवी मुंबईतील नागरिकांनी जास्तीत जास्त या प्रदर्शनाला भेट देऊन साहित्याची खरेदी करावी, अशी विनंती आयोजकांनी केली आहे. 

दुर्मीळ वस्तू उपलब्ध
ग्रामीण अस्सल गुळापासून बनवलेली चिक्की, पारंपरिक पितळेची भांडी, जंगलातून आणलेल्या वेतापासून बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, लोकर-रेशीमच्या वस्तू, हात मागावरील कपडे, गरम मसाले, सोलापुरी शेंगांची चटणी, हातसडीचा तांदूळ, लोणची, गावरान तुरडाळ, पापड इत्यादी सहसा मुंबईत न मिळणाऱ्या वस्तूही रास्त दरामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com