दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय, वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण

तेजस वाघमारे
Thursday, 29 October 2020

राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याचे दिसत आहे. असे असले तरी शाळा सुरू करण्याचा विचार दिवाळीनंतरच करण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे

मुंबई, ता. 29 : राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याचे दिसत आहे. असे असले तरी शाळा सुरू करण्याचा विचार दिवाळीनंतरच करण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा याला राज्य सरकारचे प्राधान्य असून सध्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणे योग्य नसल्याचेही त्या म्हणाल्या.

राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा विचार करणार आहे. नववी ते बारावीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असल्याने आणि त्यांचे महत्वाचे शैक्षणिक वर्ष असल्याने या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्याबाबत विचार केला जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाची बातमी : रहिवाशांना दिलासा, उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास करताना 1 वर्षाचे भाडे आगाऊ जमा करण्यासाठी एस्क्रो खातं उघडणे बंधनकारक

कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. अशा पालकांना टप्पा-टप्प्यात फी भरण्याची मुभाही देण्यात आली आहे. जर विद्यार्थी फी भरुन शकला नाही तरी शाळा अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही. शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले तर अशा शाळांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही गायकवाड यांनी दिला आहे. तसेच अशा शाळाविरोधात स्थानिक शिक्षणाधिकार्‍यांकडे तक्रार करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

अकरावी प्रवेशाबाबत लवकरच निर्णय : 

मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालये सुरू होण्यास वेळ लागत आहे. यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन विद्यार्थीहिताचा निर्णय घेण्यात येईल, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

varsha gaikwad on starting schools in the state says will decide after diwali


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: varsha gaikwad on starting schools in the state says will decide after diwali