वसईत विद्यार्थ्यांना गुदमरण्याचे प्रशिक्षण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई ः वाहतूक नियमांचे उल्लंघन करून मर्यादेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना वाहनांमध्ये कोंबून सुरू असेलेली वाहतूक.

वसई-विरारमध्ये एकाच वाहनांतून अनेक विद्यार्थ्यांना कोंबून धोकादायक प्रवास सुरू

वसईत विद्यार्थ्यांना गुदमरण्याचे प्रशिक्षण?

वसई ः शाळेत जाताना दप्तराच्या ओझ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवासही कठीण होऊन बसला आहे. वसई-विरारमध्ये खासगी वाहनांतून शाळेत विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या वाहनांमध्ये अक्षरशः विद्यार्थ्यांना कोंबले जात असून त्यांचा जीव गुदमरत आहे. त्यामुळे ही मुले शिक्षणासाठी जातात की, दाटीवाटीने प्रवास कसा करायचा, याचे प्रशिक्षण घ्यायला, अशा प्रश्‍न संतप्त पालकांनी उपस्थित केला आहे.

द.कोरियातील विद्यार्थी सांगताहेत स्वच्छतेचे महत्व

वसई-विरार शहरात खासगी आणि जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी चारचाकी, बस किंवा रिक्षातून शाळेसाठी प्रवास करतात. वाहतूक करताना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. प्रवासी किती न्यायचे, याचे भानही वाहनचालकांना असणे आवश्‍यक आहे; मात्र चार पैसे जास्त कमावण्यासाठी नियमांकडे कानाडोळा करून वाहनचालकांकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. 

बालगृहातील मुलांना स्टीव वाॅ शिकवतोय क्रिकेट!

शाळकरी मुले जेव्हा वाहनात बसतात, तेव्हा अतिशय जीवघेणा प्रवास करत असल्याचे समोर येत आहे. प्रशासनही याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. एका रिक्षातून १० ते १५, तर चारचाकी वाहनात ३० हून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे दप्तर अशी वाहतूक होत आहे.

शाळेत मुलगा सुरक्षित जावा आणि व्यवस्थित परत यावा, म्हणून पालक वाहनाची व्यवस्था करतात; परंतु जसजसे विद्यार्थी वाढतात, तशी वाहनांत जागा कमी होते आणि कोंबून त्यांची ने-आण केली जाते. पालकवर्ग खासगी वाहनांना पैसे मोजत असले, तरी परिस्थिती मात्र भयावह आहे. वाहनांत अधिक भार झाल्याने अपघात घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. शिवाय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा निर्माण होतो; मात्र वाहनचालकांना याचे सोयरसुतक नसल्याचे दिसत आहे.

शाळेच्या खासगी बसमध्येदेखील अशीच परिस्थिती आहे. मुले बसमध्ये चढतात; मात्र दरवाजे बंदिस्त नसतात. त्यातच काही विद्यार्थी हे दरवाजयावर उभे राहून हात, पाय बाहेर काढतात, स्टंट करतात. आपला मुलगा सुरक्षित असेल, अशी खात्री बाळगून पालक नोकरीला जातात; परंतु त्याची अवस्था काय हे मात्र जाणून घेत नाहीत. वसई-विरार शहरात विद्यार्थ्यांना कोंबून केली जाणारी वाहतूक रोखण्यासाठी वाहतूक विभाग, उप-प्रादेशिक परिवहन विभागाने पाऊल उचलावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागाकडून कारवाई केली जाते. खासगी वाहने जास्त संख्येने विद्यार्थ्यांना नेताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे.                                   - विलास सुपे, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, वसई

शाळा, पालक आणि वाहतूक विभाग प्रशासनाने विद्यार्थी वाहतुकीकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. विद्यार्थ्यांना कोंबून नेले जात असल्याने सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
श्रद्धा मोरे, पालक, वसई

  • याकडे द्या लक्ष...
  •      पालकांनी मुलांच्या सुरक्षिततेला महत्त्व द्यावे.
  •      खासगी वाहनांतील विद्यार्थीसंख्या तपासावी.
  •      जास्त मुले एकाच वाहनात असतील, तर चालकांना नकार द्या.
  •      प्रवासातील परिस्थितीबाबत पाल्यांकडे विचारपूस करा.
  •      जीव धोक्‍यात न टाकता अन्य सुरक्षित वाहन निवडा.

Web Title: Vasai Virar Dangerous Journey Started Beating Students Single Vehicles

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top