esakal | काँग्रेस-राष्ट्रवादीला 'वंचित'ची साथ नाहीच
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेस-राष्ट्रवादीला 'वंचित'ची साथ नाहीच

विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्यास अवघ्या पंधरा दिवसांचा अवधी शिल्लक असतानाच राज्यातील लढत मात्र तिरंगी होणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीला 'वंचित'ची साथ नाहीच

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्यास अवघ्या पंधरा दिवसांचा अवधी शिल्लक असतानाच राज्यातील लढत मात्र तिरंगी होणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे. शिवसेना - भाजपने युतीच्या आणाभाका घेतलेल्या असतानाच कॉंग्रेस - राष्ट्रवादीला राज्यात पडलेल्या खिंडारामुळे आघाडीला एकत्र संसार करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे चिन्ह आहे. लोकसभा निवडणुकीत दमदार एंट्री करणारा वंचित बहुजन आघाडी देखील कॉंग्रेससोबत जाण्याची शक्‍यता संपुष्टात आली आहे. 

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने धक्‍कादायक कामगिरी करत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती. विधानसभा निवडणुकीतही वंचितच तिसरा कोन सांभाळण्याची चिन्ह आहेत. कॉंग्रेससोबत आघाडी करण्यास वंचित इच्छुक नसल्याने ते नेहमी एक नवीन अट घालत असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. कॉंग्रेसने राष्ट्रवादीसोबत आघाडी करू नये अशी नवीन मागणी वंचितने केली असल्याने कॉंग्रेसकडूनही आता वंचितला प्रतिसाद देणे बंद झाले आहे.

दरम्यान, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत वंचितचे नेतृत्व करत असलेल्या भारीप बहुजन महासंघाने 70 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी 62 जागांवर उमेदवारांची अनामत रक्‍कमही जप्त झाली होती. त्यावेळी एकूण झालेल्या मतांपैकी वंचितचा टक्‍का केवळ 0. 89 टक्‍के इतकाच होता.

'वंचित'ची ताकद 

राज्याच्या आगामी राजकारणात वंचित बहुजन आघाडी महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्‍यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच वर्तवली आहे. येत्या काळात वंचित हा प्रमुख विरोधी पक्ष असेल असे भाकीत करत फडणवीस यांनी वंचितचे महत्त्व ठळक केले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित 48 पैकी अकोल्याच्या जागेवर दुसऱ्या क्रमांकावर तर बाकीच्या सर्व जागांवर तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. आंबेडकरांच्या वंचितला एमएमआयएचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी ताकद दिल्याने वंचितला लोकसभा निवडणुकीत बळ मिळाले होते.

loading image
go to top