esakal | भाज्यांचे दर कडाडले; गौरी गणपती सणामुळे भाज्यांनी गाठली शंभरी
sakal

बोलून बातमी शोधा

भाज्यांचे दर कडाडले;  गौरी गणपती सणामुळे भाज्यांनी गाठली शंभरी

गौरी गणपती उत्सवाचे दिवस सुरु असल्याने ग्राहक भाजीपाला खरेदीसाठी गर्दी करत आहेत. भाज्यांच्या या वाढलेल्या किंमतीमुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे. 

भाज्यांचे दर कडाडले; गौरी गणपती सणामुळे भाज्यांनी गाठली शंभरी

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

ठाणे - पावसाचा तडाखा आणि राज्या बाहेरील गाड्यांची रोडावलेली संख्या यामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत ऐन गणेशोत्सवात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. भाजीपाल्याच्या 100 गाड्याही बाजारात दाखल झाल्या नसल्याने घाऊक बाजारातच भाज्यांचे दर वाढले आहेत. मालाची कमी आवक आणि चढे दर यामुळे किरकोळ बाजारातील विक्रेत्यांनी तर सरसकट सर्वच भाज्यांचे दर हे 100 च्या पुढे नेऊन ठेवले आहेत. गौरी गणपती उत्सवाचे दिवस सुरु असल्याने ग्राहक भाजीपाला खरेदीसाठी गर्दी करत आहेत. भाज्यांच्या या वाढलेल्या किंमतीमुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे. 

सौम्य कोविड रुग्णांच्या उपचारासाठी लवकरच बाजारात नवी टॅब्लेट्स  

कोरोना संक्रमण काळात बंद असलेला कृषी उत्पन्न बाजार गणेशोत्सवाच्या काही दिवस आधी सुरु करण्यात आल्याने मालाची आवक वाढून कल्याण डोंबिवलीत वाढलेले भाज्यांचे दर काहीसे कमी होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. गणेशोत्सवात भाज्यांचे दर दरवर्षी चढे असतात, परंतू यावर्षी कोरोना संक्रमणामुळे राज्यातील भाजीपाला कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होऊन भाज्यांचे दर कमी होतील अशी आशा व्यक्त केली जात होती. परंतू राज्यातील पावसाची स्थिती आणि राज्याबाहेरील गाड्यांची कमी असलेली आवक याचा फटका विक्रेत्यांसह ग्राहकांनाही बसत आहे. गणेशोत्सवाचे दिवस सुरु असून ग्राहक बाजारात भाजीपाला खरेदीसाठी गर्दी करत आहेत. परंतू भाज्यांच्या वाढलेल्या किंमतीनी विक्रेत्यांसह ग्राहकांनाही घाम फोडला आहे. 

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी 86 भाजीपाल्याच्या गाड्या दाखल झाल्या असून यामध्ये राज्यातून 78 गाड्या तर राज्या बाहेरुन 8 गाड्या बाजारात दाखल झाल्या आहेत. आवक झालेल्या मालात 2 हजार 310 क्विंटल भाजीपाला व 165 क्विंटल पालेभाजीचा समावेश आहे. पावसाचा तडाखा बसल्याने भाजीपाला खराब झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बाजारात भाजीपाल्याच्या गाड्यांची आवक कमी होत आहे. ऐरवी बाजारात 200 च्या आसपास भाजीपाल्याच्या गाड्या दाखल होत असतात. परंतू कोरोना संक्रमण आणि इतर गोष्टींमुळे भाज्यांची आवक काही वाढलेली नाही. माल कमी असल्याने भाज्यांचे दरही चढे असल्याचे बाजार समितीती अधिकाऱ्यांनी सांगितले. 

अफलातून! तब्बल २६ वर्षांनी सापडली ट्रेनमध्ये चोरीला गेलेली सोनसाखळी

घाऊक बाजारातच भाजीपाल्याच्या किंमती या 20 ते 40 रुपये किलोच्या घरात असल्याने किरकोळ बाजारात विक्रेत्यांनी सरसकट सर्वच भाज्यांचे दर हे 120 रुपये किलोच्या आसपास नेऊन ठेवले आहेत. बुधवारी घरोघरी गौराईंचे आगमन होत आहे. त्यामुळे मंगळवारी बाजारात गौरीचा ओवसा, नैवेद्याच्या भाज्या, तसेच इतर भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

घाऊक बाजारात मालाची आवक कमी आणि दर जास्त आहेत. तसेच ग्राहकांचीही मागणी जास्त असून तेवढा पुरवठा नसल्याने भाजीपाला दरात वाढ झाली आहे. पावसाचे दिवस असल्याने माल खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळेही भाज्यांच्या दरात वाढ झाली असल्याचे विक्रेते विलास चौधरी यांनी सांगितले. 

भाजी घाऊक बाजार दर (किलो) किरकोळ बाजार दर (किलो)
टोमॅटो 30 60
भेंडी 32 120
गवार   45 160
वांगी 40 80 
शिमला मिरची 35 130
कारले 28 120
फरसबी   30 140
वाटाणा 90 200

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top