लॉकडाऊनच्या तडाख्यातून वाहन क्षेत्र सावरतंय; विक्रीत झालीये इतकी वाढ...

विनोद राऊत
Wednesday, 2 September 2020

लॉकडाऊननंतर वाहन क्षेत्र मंदीच्या तड्याख्यातून हळूहळू सावरत असल्याचे दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्यात मारुती सुझुकीने आपल्या कार विक्रीत 21.3 टक्के वाढ नोंदवली आहे; तर हुदांई मोटर्सच्या विक्रीत 19.9 टक्के वाढ झाली आहे. याशिवाय दुचाकी वाहनांच्या विक्रीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

मुंबई : लॉकडाऊनचा वाहन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला होता, या काळात वाहन विक्री चांगलीच मंदावली होती. मात्र सरकारने नियमांमध्ये शिथिलता आणल्यानंतर वाहन क्षेत्र मंदीच्या तड्याख्यातून हळूहळू सावरत असल्याचे दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्यात मारुती सुझुकीने आपल्या कार विक्रीत 21.3 टक्के वाढ नोंदवली आहे; तर हुदांई मोटर्सच्या विक्रीत 19.9 टक्के वाढ झाली आहे. याशिवाय दुचाकी वाहनांच्या विक्रीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

ऑगस्ट महिन्यात ग्राहकांची पावले कार शोरुमकडे पडायला लागली आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत ऑगस्टमध्ये देशात कार खरेदीचे प्रमाण वाढले आहे. देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने ऑगस्ट महिन्यात एकूण 1,12,033 कार विकल्या असून, या महिन्यात विक्रीत 19.9 टक्के इतकी वाढ नोंदवली गेली आहे; तर हुदांईने ऑगस्टमध्ये एकूण 45,809 कारची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने केवळ 38,205 कार विकल्या होत्या. 

दुचाकी विक्रीतही चांगली वाढ झाली असून, हिरो मोटोकॉर्पने गेल्या वर्षाच्या तुलनेत या महिन्यात दुचाकी विक्रीत 7.6 टक्के वाढ नोंदवली आहे. 2019 च्या ऑगस्टमध्ये कंपनी केवळ 5,43,406 दुचाकींची विक्री करू शकली होती. ग्रामीण भागातून दुचाकीच्या मागणीत वाढ झाली आहे. चांगल्या पर्जन्यमानामुळे ग्रामीण भागात दुचाकींची अधिक विक्री झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. यामध्ये पहिली गाडी घेणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जुलै महिन्याची तुलना केल्यास कार विक्रीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येते. मारुतीने मे महिन्यात 13,865, जूनमध्ये 51,274 तर जुलै महिन्यात 1 लाख कार विकल्या होत्या; तर या महिन्यात हुदांई मोटर्सचा खपही घसरला होता. 

मिनी सेगमेंटचा खप दुप्पट 
मारुती सुझुकीच्या मिनी सेगमेंटमधील आल्टो, एस प्रेसो या मॉडेलचा खप दुपट्ट झाला आहे. ऑगस्टमध्ये कंपनीने या सेगमेंटमधील 19,709 कारची विक्री केली. गेल्या वर्षी या महिन्यात केवळ 10,123 विक्री झाल्या होत्या. कॉम्पक्‍ट सेगमेंटमधील वॅगन आर, स्विफ्ट, सेलीरीओ, इग्नीस, बलेनो, डिझायर या कारच्या खपात 14.2 टक्‍क्‍यांनी, तर यूटीलीटी सेगमेंटमध्ये कार विक्रीत 13.5 टक्के इतकी वाढ नोंदवली गेली आहे. ऑगस्टमध्ये मारुतीने 7,920 कार निर्यात केल्या. गेल्या वर्षी या महिन्यात कंपनीने 9,352 कार निर्यात केल्या होत्या. 

ऑगस्ट महिन्यात झालेली वाहन विक्री 

कंपनी विक्री झालेल्या कार विक्रीतील वाढ (टक्‍क्‍यांत) 
मारुती सुझुकी (चारचाकी) 1,12,033 19.9 
हुदांई (चारचाकी) 45,809 19 
हिरो मोटोकॉर्प (दुचाकी) 5,43,406 7.6

-----------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vehicle sector preceded post-lockdown, buying increased in August; Demand for two-wheelers in rural areas