
मुंबई : अनलॉक प्रक्रियेअंतर्गत राज्यातील हॉटेल आणि लॉज कठोर निर्बंधासह खुली करण्याचे ठरले; पण दोन आठवड्यानंतरही अनेक हॉटेल, लॉजला फारसा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत नाही. अर्थात अजून मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत प्रवास सुरु न झाल्याचा फटका हॉटेल व्यवसायाला बसत आहे.
हॉटेल चालवण्यासाठी किंवा पुरेसा नफा मिळवण्यासाठी किमान पन्नास टक्के खोल्या आरक्षित असणे आवश्यक असते, पण हॉटेल सुरु होऊन दोन आठवडे झाल्यानंतरही केवळ दहा टक्केच खोल्या आरक्षित झाल्याचे चित्र आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे हॉटेल व्यवसायाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याची तक्रार होत आहे. हॉटेल सुरु करण्यास मंजूरी देण्यात आली, परंतु तरण तलाव, जीम, गेमिंग आर्केड बंदच ठेवण्याची सूचना आहे. देशभरातील विमानसेवा मर्यादित स्वरुपात सुरु झाली आहे. रेल्वेचीही फार वेगळी स्थिती नाही. खासगी बससेवा अजूनही सुरु झालेली नाही. कॉर्पोरेट कार्यालये सुरु झाली आहेत, पण त्याचे कर्मचारी मर्यादित संख्येतच आहेत. या सर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे हॉटेल आरक्षणच होत नसल्याचे हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनेच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष गुरुबक्षिससिंग कोहली यांनी सांगितले.
मुंबईतील काही हॉटेलनी सध्याची परिस्थिती ओळखून आपला व्यवसाय बंद ठेवला आहे, पण काहींनी कर्मचाऱ्यांचा विचार करुन हॉटेल सुरु केली आहेत. कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही अवघड होत आहे. मात्र काही उत्पन्न मिळावे यासाठी हॉटेल खुले ठेवले असल्याचे अंधेरीतील एम्प्रेसा हॉटेलचे कमलेश बारोट यांनी सांगितले. त्या हॉटेलमधील 33 पैकी 3 खोल्याच आरक्षित आहेत. अंधेरीच्या रॅडिसन मुंबईची क्षमता 111 खोल्यांची आहे, पण त्यांच्याकडेही पाच ते दहा टक्केच आरक्षण होत असल्याचे सांगण्यात आले.
हॉटेलचा प्रामुख्याने बिझनेस हा व्यवसायांसाठी प्रवास करणाऱ्यांवर अवलंबून असतो. सध्या देशभरातील अनेक जण मुंबईत येणे टाळत आहेत. अत्यावश्यक असेल तरच मुंबईत काही जण येत आहेत. ही परिस्थिती दोन-तीन महिने तरी बदलणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
---
(संपादन ः ऋषिराज तायडे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.