मास्क वापरणे बंधनकारक नसल्याचा तो व्हिडिओ चुकीचा; आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

भाग्यश्री भुवड
Sunday, 30 August 2020

मास्क वापरण्याबाबतच्या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असुन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी मास्कचा वापर करणे आवश्यक असल्याचे स्पष्टीकरण आरोग्य खात्याने दिले आहे. 

मुंबई : मास्क वापरण्याबाबतच्या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असुन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी मास्कचा वापर करणे आवश्यक असल्याचे स्पष्टीकरण आरोग्य खात्याने दिले आहे. मास्क वापरणे सर्वांना बंधनकारक नसल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियातून व्हायरल होत असून अनेक जण तो फॉरवर्ड करत आहेत. मात्र, या व्हिडिओबाबतची सत्यता आता समोर आली आहे. याबाबत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने स्पष्टीकरण दिले आहे. तो व्हिडिओ हा मध्य प्रदेश सरकारने तयार केला असून तो फेब्रुवारी, मार्च महिन्यातील आहे. तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने मास्क वापरणे बंधनकारक केले नव्हते. मात्र आता मास्क वापरणे बंधनकारक आहे, असे महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे. 

कोरोनाच्या भीतीने वाफ देण्याच्या मशीनला मागणी वाढली; रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचा दावा

काय आहे व्हिडिओत? 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ मध्य प्रदेश सरकारच्या आरोग्य विभागाकडून राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सहाय्याने तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला बस स्थानकावर विनामास्क मोबाईलवर बोलत असते. दरम्यान, तिच्या जवळच बसलेल्या दोन व्यक्ती तिने तोंडावर मास्क न लावल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत तिला याबाबत विचारणा करतात. तुम्ही तोंडाला मास्क का लावलेले नाही? असे त्यांनी विचारल्यानंतर डॉक्टर असलेली ही महिला त्यांना सांगते की, कोणत्याही सुदृढ व्यक्तीला मास्क लावायची गरज नाही. तर दवाखान्यात जाताना, कोणत्या आजारी व्यक्तीची देखभाल करताना किंवा तुम्हाला सर्दी-खोकला झाला असेल तरच तुम्ही मास्कचा वापर करायला हवा. डॉक्टर महिलेच्या अशा सांगण्यावरुन तिला प्रश्न विचारणारे दोघे व्यक्ती निश्चिंत होऊन आपल्या तोंडावरील मास्कही काढतात आणि जाहिरात संपते.

आयआयटी पवईत कामादरम्यान मार्बलच्या लाद्या अंगावर पडून दोन कामगारांचा मृत्यू

महाराष्ट्र आरोग्य खात्याकडून स्पष्टीकरण -

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने यावर स्पष्टीकरण देत म्हटले की, मास्कच्या वापराबाबत सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ फेब्रुवारी-मार्च या कालावधीतील आहे. तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मास्क वापरणे सर्वांना बंधनकारक केलेले नव्हते. मात्र, आता देशात सर्वत्र मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या या स्पष्टीकरणानंतर सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ जुना असल्याचे समोर आले आहे. WHO ने तेव्हा मास्क बंधनकारक असल्याच्या कोणत्याही सूचना दिल्या नव्हत्या. लोकांमध्ये मास्कची अनाठायी भीती राहू नये म्हणून त्यावेळी ही जाहिरात मध्य प्रदेश सरकारने तयार केली होती. मात्र, सध्या आपल्या देशात कोरोनाचे संक्रमण हे उच्च पातळीवर पोहोचले असल्याने तोंडाला मास्क लावणे ही कोविड-19 संदर्भातील नियमावलीतील पहिलीच अट बनली आहे. त्यामुळे संबंधित व्हिडिओकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन करुन मास्क घालणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: That video of not wearing a mask is wrong; Department of Health explanation