VIDEO! मिठी नदी खालील मेट्रो 3 प्रकल्पाचे भुयारीकरणाचे काम पूर्ण; 'गोदावरी 4' टनेल बोरिंग मशीनची कमाल

तेजस वाघमारे
Wednesday, 19 August 2020

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) द्वारे बुधवारी (ता.19) मिठी नदी खालील 1.5 किलोमीटर लांबीचे भुयार पूर्ण करण्यात आले.

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) द्वारे बुधवारी (ता.19) मिठी नदी खालील 1.5 किलोमीटर लांबीचे भुयार पूर्ण करण्यात आले. टेराटॅक-निर्मित गोदावरी-4 या टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) द्वारे बीकेसी ते धारावी पर्यंतचे अंतर पूर्ण केले.

महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेची मुदत वाढली; आरोग्य विभागाने घेतलेल्या निर्णयाविषयी जाणून घ्या

बीकेसी येथील लाँचिंग शाफ्टपासून 21 ऑगस्ट 2019 रोजी गोदावरी-4 चे काम चालू करण्यात आले. धारावीपर्यंत 1 हजार 43 आरसीसी रिंग्ससह भुयार पूर्ण झाले. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-3 मार्गाचा हा 29 वा भुयारीकरणाचा टप्पा आहे. या प्रकल्पाचे आतापर्यंत सुमारे 85 टक्के भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यावर्षी मार्च महिन्यात टीबीएम मशीनने बीकेसी ते धारावीपर्यंत 1.5 किमी डाऊन मार्गाचे भुयारीकरण पूर्ण केले होते. बीकेसी ते धारावी पर्यंतच्या 3 किलोमीटर(अप आणि डाऊनलाइन) पैकी 484 मीटर भुयार सक्रिय मिठी नदीच्या पात्राखाली आहे. धारावी, बीकेसी, विद्यानगरी व सांताक्रूझ स्थानकांचा समावेश असलेल्या पॅकेज-5 ने संपूर्ण 8 किलोमीटर लांबीचे भुयार पूर्ण केले आहे. प्रकल्पाचे आतापर्यंत 17 टीबीएमच्या मदतीने जवळपास 85 टक्के भुयारीकरण आणि एकूण 59 टक्के बांधकाम पूर्ण केले आहे.

मिठी नदी खालील भुयारीकरण मेट्रो-3 प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक कामांपैकी एक होते. मुंबईतील गुंतागुंतीची भौगोलिक रचना, भूगर्भातील पाण्याची उच्च पातळी शिवाय कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे येणाऱ्या मर्यादा यामुळे हे काम अधिकच कठीण होते. मात्र आमच्या टीमने हे शिवधनुष्य यशस्वीपणे पार पाडले याचा आनंद आहे, असे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल म्हणाले.

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: VIDEO! Undergrounding of Metro 3 project under Mithi river completed; Maximum of Godavari 4 tunnel boring machine