मुंबईत फूलणार कमळ ? मुंबईत भाजपच मोठा भाऊ ? | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

मुंबईत कोण मारणार बाजी ? मुंबईतील मोठा भाऊ कोण ? 

मुंबई :  शिवसेना भाजपच्या युतीचा फायदा दोन्ही पक्षांना होणार असून मुंबईत या युतीचे चांगले परिणाम दिसतील अशी चर्चा मुंबईत सुरू आहे. गेल्या विधानसभेला शिवसेना भाजपची युती नव्हती. गेल्या वेळी दोन्ही पक्षाचे जे आमदार निवडून आले त्यांपैकी बहुतांश आमदारांना त्यांच्या मतदार संघात यावेळी युतीने उमेदवारी दिली होती. युतीचा फायदा दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना होण्याची दाट होण्याची शक्‍यता असून शिवसेनेतील बंडखोरी पाहता मुंबईत पुन्हा कमळ फुलण्याची शक्‍यता आहे. मुंबईत एकूण 36 विधानसभा मतदारसंघ आहेत. 

शिवसेना भाजपचा एकमेकांना फायदा ?

भाजपला शिवसेनेचा फायदा होईल, तसा शिवसेनेलाही यावेळी भाजपचा फायदा होण्याची शक्‍यता आहे. वर्सोवा आणि वांद्रे पूर्व या मतदार संघात शिवसेनेत बंडखोरी झाली. काही मतदार संघात भाजपच्या विद्यमान आमदारांची तिकीटे कापल्याने तेथे दुसऱ्या उमेदवारांना संधी दिली. त्यामुळे काही ठिकाणी नाराजी दिसली तरी त्याचा परिणाम मतदानावर झाला नसल्याचे दिसले. त्यामुळे यावेळी युतीतील दोन्ही पक्ष निवडणुकीनंतर निर्धास्त असल्याचे दिसत आहेत.

युतीच्या तुलनेत आघाडी कमी पडणार ?

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच इतर पक्षांनीही आपली ताकद पणाला लावली होती. युतीच्या तुलनेत आघाडी कमी पडल्याचे दिसून आले. आघाडीने तसेच इतर पक्षाच्या उमेदवारांनी उशिराने प्रचार सुरू केला. प्रचारात युतीने आघाडी घेतली तसेच त्यांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी बळकट असल्याचा फायदा युतीला होण्याची शक्‍यता आहे.

मनसेमुळे  मतांचे विभाजन ?

मनसेमुळे यावेळी शिवसेनेच्या मतांचे विभाजन होण्याची शक्‍यता आहे. मनसे गेल्या लोकसभेला लढली नव्हती. यावेळी मनसेचा शिवसेनेला दगाफटका होण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. मात्र कमळाला मतदारांचा मोठा पाठिंबा राहिल्याचे दिसून आले.

बोरिवलीतून सुनील राणे, दहिसरमध्ये मनिषा चौधरी, मुलुंडमध्ये मिहिर कोटेचा, कांदिवली येथून अतूल भातखळकर, चारकोपमधून योगेश सागर, मालाड पश्‍चिममध्ये रमेश ठाकूर, गोरेगावमध्ये विद्या ठाकूर, अंधेरीमध्ये अमित साटम, विलेपार्लेमधून पराग अळवणी, घाटकोपर पश्‍चिममधून राम कदम, घाटकोपर पूर्व येथून पराग शहा, वांद्रे पश्‍चिम येथून आशिष शेलार, मलबार हिल मधून मंगलप्रभात लोढा आदी भाजपच्या उमेदवारांना या निवडणुकीत मतदार संधी देतील अशी शक्‍यता आहे. मुंबईत भाजपला अनुकूल वातावरण असल्याचे दिसून आले.

WebTitle : vidhansabha election 2019 results of mumbai 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhansabha election 2019 results of mumbai