Vidhansabha 2019 : युतीला चिंता पक्षांतर्गत कुरघोडीची!

समीर सुर्वे
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

‘राष्ट्रवादी’चे मुंबई अध्यक्ष सचिन अहीर शिवसेनेत गेलेले आणि काँग्रेसचे आमदार कालीदास कोळंबकर भाजपच्या वाटेवर, ही राज्यातील दोन प्रमुख विरोधी पक्षांची मुंबईतील अवस्था. येथे मुळातच लढत तुल्यबळांतील नाही. तशात अजूनही मुंबईत मोदीलाट आहे. त्यातून तरण्याचा प्रयत्न शिवसेना करीत आहे, त्याचवेळी त्यांचे एक बोट भाजपच्या हातात आहे. पूर्वी चित्र उलट असे. असे असले, तरी मुंबईतील बहुसंख्य मराठी मतदार हा मनाने कायमच ‘शिवसेनाईट’ असल्याने त्याचा शिवसेनेला फायदा होतोच. आता भाजप हा ‘जुळा भाऊ’च असल्याने दोन्ही पक्षांना त्याचा लाभ होईल.​

काँग्रेस, राष्ट्रवादीची दुबळी स्थिती शिवसेना, भाजप यांच्या पथ्यावर पडण्याऐवजी त्यांच्यात युती झाल्यास पक्षांतर्गत कुरघोडीचे मोठे आव्हान उभे राहू शकते. त्यावर कशी मात करणार, यावर यशाची गणिते ठरणार आहेत.

‘राष्ट्रवादी’चे मुंबई अध्यक्ष सचिन अहीर शिवसेनेत गेलेले आणि काँग्रेसचे आमदार कालीदास कोळंबकर भाजपच्या वाटेवर, ही राज्यातील दोन प्रमुख विरोधी पक्षांची मुंबईतील अवस्था. येथे मुळातच लढत तुल्यबळांतील नाही. तशात अजूनही मुंबईत मोदीलाट आहे. त्यातून तरण्याचा प्रयत्न शिवसेना करीत आहे, त्याचवेळी त्यांचे एक बोट भाजपच्या हातात आहे. पूर्वी चित्र उलट असे. असे असले, तरी मुंबईतील बहुसंख्य मराठी मतदार हा मनाने कायमच ‘शिवसेनाईट’ असल्याने त्याचा शिवसेनेला फायदा होतोच. आता भाजप हा ‘जुळा भाऊ’च असल्याने दोन्ही पक्षांना त्याचा लाभ होईल. 
मुंबईत समस्यांचा डोंगर आहे. यातील अनेकांचे दायीत्व शिवसेनेच्या ताब्यातील महापालिकेकडेच येते. महापालिकेच्या कारभाराबाबत मतदारांत नाराजी नेहमीच दिसते. पण येथे मतदान होते ते भावनेच्या बळावर. भ्रष्टाचार, नागरी समस्या अशा ‘किरकोळ‘ गोष्टींना त्यात स्थान नसते.

गेल्या विधानसभेवेळी हेच घडले. त्यामुळे येथे सध्या तरी निवडणूक निकालाचे कुतूहल नाही. औत्सुक्‍य आहे ते युतीतील जागावाटप आणि नंतरच्या तिकीटवाटपाबद्दल. मुंबईत जिल्हा आणि उपनगर जिल्हा असे दोन जिल्हे. पण मुंबईची विभागणी होते ती प्रशासकीय विभागांऐवजी रेल्वेच्या मार्गांनी. पूर्व आणि पश्‍चिम अशी. मध्य रेल्वेच्या या पूर्व भागात येतो कुलाबा, फोर्टपासून मुलुंड, मानखुर्दपर्यंतचा एकूण १६ विधानसभा मतदारसंघांचा परिसर. आता कोळंबकरांचा वडाळा धरल्यास त्यातील १३ मतदारसंघ युतीच्या ताब्यात आहेत. तेथील शिवडी, चेंबूर, अणुशक्तिनगर आणि सपचे शिवाजीनगर वगळता एकाही मतदारसंघात विरोधकांची ताकद नाही. वंचित बहुजन आघाडीचा चेंबूरमध्ये जोर. तेथे शिवसेनेला फटका बसू शकतो. अन्यत्र आघाडीचाच तोटा होईल. मात्र अहीर आणि कोळंबकर यांच्या पक्षांतरामुळे दोन मतदारसंघांत युतीमध्येच वादाची शक्‍यता आहे. 
अहीर यांना भायखळ्यातून उमेदवारी मिळेल, अशी चर्चा आहे.

‘एमआयएम’चे ॲड. वारिस पठाण तेथील आमदार. पण तेथून मधू चव्हाण यांना भाजप लढवणार आहे. शिवाय शिवसेनेतही स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासारख्यांचा या जागेवर डोळा आहेच. अशीच गत कोळंबकरांच्या वडाळ्याची. येथे पूर्वीपासूनच शिवसेना लढत असल्याने त्यांचा दावा असू शकेल. शीव-कोळीवाड्यातून भाजपचे आमदार तमिल सेल्वन यांना मुख्यमंत्र्यांचे लाडके प्रसाद लाड यांच्याशी उमेदवारीसाठी लढत द्यावी लागेल, असे दिसते. घाटकोपर पूर्व आणि पश्‍चिम या मतदारसंघांतही तेच. घाटकोपर पूर्वचे प्रकाश महेता आणि पश्‍चिमचे राम कदम यांच्यावर मुख्यमंत्री नाराज आहेत. महेतांना पर्याय म्हणून अतुल शहा, तर कदमांना अवधुत वाघ किंवा प्रवीण छेडा ठरतील, अशी चर्चा आहे. कुलाबा मतदारसंघ भाजपच्या राज पुरोहित यांच्याकडे आहे. त्यांना विरोध झालाच तर तो पक्षांतर्गतच. मुलूंडमध्ये भाजपचे आमदार तारासिंह यांना या वेळी तिकीट मिळणे अवघड मानले जाते. तेथे प्रकाश गंगाधरे, समिता कांबळे यांच्यासह किरीट सोमय्यांचे नगरसेवक पुत्र नील स्पर्धेत येतील. 

या निवडणुकीत चुरस झालीच तर ती चेंबूर आणि अणुशक्तिनगरमध्ये. चेंबूरमध्ये शिवसेनेचे प्रकाश फातर्फेकर हे विद्यमान आमदार. तेथे रिपब्लिकन आठवले गटाचे दीपक निकाळजे आणि वंचित बहुजन हे दोन घटक महत्त्वाचे, तर अणुशक्तीनगरमध्ये शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांची राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांच्याशी लढत आहे. हा सद्यपरिस्थितीतील पूर्व मुंबईतील मतदारसंघांचा लेखाजोखा. तेथे युतीला चिंता असेल ती आघाडीची नव्हे, तर पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाची.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Yuti Shivsena BJP Internal Issue Politics