विद्या बालन साकारणार इंदिरा गांधी!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

मिशन मंगलच्या भरघोस यशानंतर आता वेबसिरीजमध्ये पदार्पण 

मुंबई : हिंदी सिनेअभिनेत्री विद्या बालन हिला सध्या आनंदाचा पारावार उरलेला नाही. त्याचे कारणही तसेच आहे. तिच्या मिशन मंगल या चित्रपटाच्या मोठ्या यशानंतर आता तिच्याकडे विविध विषयांवरील चित्रपटांच्या स्क्रिप्ट्‌सची रिघ लागली आहे. तुम्हारी सुलूनंतर काही काळ थांबून विद्याने एक मोठी झेप घेत पुन्हा यशस्वी पुनरागमन केले आहे.

मिशन मंगल चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर आतापर्यंत 200 कोटींची कमाई केली असून ती तिच्या या यशाचा आनंद घेत पुढील कामासाठी सज्ज झाली आहे. ही अभिनेत्री आता आगामी वेबसिरीजसाठी इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 

गांधींची भूमिका करण्याच्या निर्णयाबाबत बोलताना विद्या म्हणाली की, "मी जेव्हा शक्तिशाली महिलांबाबत विचार करते, तेव्हा माझ्या मनात सर्वात प्रथम इंदिरा गांधी यांचीच प्रतिमा उभी राहाते. मला अन्य कोणत्याही राजकीय पक्षाबाबत देणेघेणे नाहीये. मी करत असलेली वेबमालिका ही कोणत्याही पक्षाबाबत नसून, ती एका अशा व्यक्तीवर आधारित आहे जी राजकारणापेक्षा मोठी आहे.' 

शूटिंगला अद्याप सुरुवात झालेली नाही. कारण ही वेबसिरीज असल्याने त्यासाठीच्या वेगवेगळ्या कामांसाठी मोठ्या कालावधीची आवश्‍यकता असल्याचे विद्याने सांगितले. त्यामुळे शूटिंग सुरू होण्यास आणखी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असेही तिने स्पष्ट केले. दरम्यान विद्या लवकरच प्रसिद्ध गणितज्ज्ञाच्या बायोपिकमध्ये शकुंतला देवीची भूमिका साकारणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidya Balan will be seen portraying the role of Indira Gandhi