Mumbai : राष्ट्रीय सरचिटणीसपदी विनोद तावडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vinod tawade

राष्ट्रीय सरचिटणीसपदी विनोद तावडे

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी विनोद तावडे यांची नियुक्ती केल्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केली. ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने तावडे यांच्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा रोष संपल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.

दिवंगत प्रमोद महाजन यांच्यानंतर ही जबाबदारी तावडे यांच्या रूपाने पहिल्यांदाच महाराष्ट्रातील नेत्याला मिळाली आहे. वर्षभरापूर्वी तावडे यांना राष्ट्रीय चिटणीस म्हणून जबाबदारी दिली होती. त्याचबरोबर भाजपशासित हरियाना राज्याचे प्रभारी तसेच पंतप्रधान कार्यालयातील ‘मन की बात’ व विविध केंद्र सरकारच्या योजना याची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. आता राष्ट्रीय सरचिटणीसपदाच्या रूपाने तावडे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकल्याचे मानले जात आहे.

महाराष्ट्रात सत्ता नसताना १९९९ ते २०१४ या काळात भाजप आणि परिवाराला तावडे यांचा मोठा आधार वाटे. गोपीनाथ मुंडे यांच्या खालोखाल त्यांचा प्रभाव असे. मुंबई तसेच उर्वरित महाराष्ट्रात तावडे यांनी नेते नितीन गडकरींच्या बरोबरीने भाजपला पुढे नेण्यात सक्रिय भूमिका निभावली. त्यानंतर मात्र मोदींच्या जवळचे मानले जाणारे तावडे काहीसे बाजूला फेकले गेले होते. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे तुलनेने बिनमहत्वाचे मानले जाणारे शिक्षण खाते सोपवले गेले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारीही नाकारली गेली.

मोदी आणि शहा यांच्या रोषामुळे त्यांना योग्य स्थान मिळत नव्हते. मात्र जे. पी. नड्डा यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तावडे यांची चिटणीसपदी नियुक्ती झाली. काही महिन्यांच्या चिटणीसपदावरील कामानंतर त्यांना आता राष्ट्रीय सरचिटणीस नेमले आहे.

loading image
go to top