
डोंबिवली : कल्याण ग्रामीण भागातील शीळ गावातील पत्रकार विनोद वास्कर यांना शुक्रवारी भर चौकात काही नागरीकांकडून मारहाण करण्यात आली. मारहाण कर्त्यांनी बांबूने व लाथाबुक्क्यांनी त्यांना जबर मारहाण केली असून त्यांच्यावर ठाणे येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या मारहाणीचे व्हिडीओ समाज माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर अखेर शनिवारी शीळ डायघर पोलिसांनी राहूल काटे व जितू आलिमकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पत्रकारास मारहाण झाल्यामुळे त्याचे तीव्र पडसाद गावांत उमटत असून आमदार राजेश मोरे यांनी देखील मारहाण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.