उरण मतदारसंघातून विवेक पाटील यांचे नाव जाहीर

सकाळ वृत्‍तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

पनवेलमधील उमेदवाराबाबत गुप्तता  

पनवेल : शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात उरण विधानसभा मतदारसंघातून शेकापतर्फे माजी आमदार विवेक पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. रविवारी (ता.२२) जासई येथे लाेकनेते दि.बा.पाटील मंगल कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  

या वेळी माजी मंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार विवेक पाटील, आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, पनवेल पंचायत समिती माजी सभापती काशिनाथ पाटील, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, पनवेल व उरणमधील शेकाप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

एकेकाळी राज्यातील विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळवलेल्या शेतकरी कामगार पक्षानेदेखील निवडणुकीच्या तयारी अंतर्गत तालुक्‍यातील प्रभावी उमेदवाराची चाचपणी करायला सुरुवात केली असून, विविध भागात घेण्यात येणाऱ्या मेळाव्यातून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचे प्रयत्न पक्षातर्फे केले जात आहेत. मागील काही दिवसांपासून आजारपणामुळे राजकारणापासून दूर राहिलेल्या विवेक पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा होताच उपस्थित शेकाप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला असून निवडणूक लढवण्याची आपली मनस्थिती नसताना फक्त कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटीच आपण ही निवडणूक लढवीत असल्याचे मत या वेळी बोलताना विवेक पाटील यांनी व्यक्त केले आहे. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या अटीतटीच्या झालेल्या लढतीत शिवसेनेचे उमेदवार विद्यमान आमदार मनोहर भोईर यांनी विवेक पाटील यांचा अवघ्या ८४६ मतांनी पराभव केला होता.

पनवेलमधून कोण?
उरण विधानसभा उमेदवारासोबत पनवेल मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाची घोषणादेखील रविवारी करण्यात येईल, अशी अपेक्षा केली जात होती; मात्र फक्त उरण विधानसभेकरिता उमेदवाराची घोषणा करण्यात आल्याने पनवेल विधानसभा मतदारसंघातील शेकाप उमेदवाराबाबत मात्र अद्यापही संभ्रम कायम ठेवण्यात आला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vivek Patil's name was announced from Uran constituency