माणगावातील या भिंतीने घडवला चमत्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

माणगाव एसटी बसस्थानकासमोर "माणुसकीची भिंत' उभी केली असून तिने चमत्कार घडवला आहे. अनेक जण या ठिकाणी वस्तू आणि अन्य मदत करत आहेत. 

माणगाव : गरिबीमुळे अनेक मुलांना शिक्षण घेता येत नाही. काहींना तर पुरेसे कपडेही मिळत नाहीत. या दयनीय स्थितीतून अशा गरीब आणि गरजूंना बाहेर काढण्यासाठी माणगाव व्यापारी असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. या संघटनेने माणगाव एसटी बसस्थानकासमोर "माणुसकीची भिंत' उभी केली असून तिने चमत्कार घडवला आहे. अनेक जण या ठिकाणी वस्तू आणि अन्य मदत करत आहेत. 

रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव तालुक्‍यात विविध जाती, धर्माचे आणि सर्व आर्थिक स्तरातील नागरिक वास्तव्य करत आहेत. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी माणुसकीच्या भिंतीची संकल्पना सुरू झाली आहे. या ठिकाणी कपडे, शैक्षणिक आणि अन्य कोणत्याही स्परूपाची मदत करता येणार आहे. यासाठी कोणतेही निकष नाहीत. भिंतीजवळ ठेवलेल्या वहीत नोंद करावी, अभिप्राय द्यावा आणि वस्तू अथवा अन्य स्वरूपाची मदत करावी, असा हेतू आहे. 

या संघटनेने आतापर्यंत प्लास्टिकविषयी जनजागृती, वृक्षारोपण, रुग्णांना फळवाटप, शहरातील गरजूंना गोधडी-ब्लॅंकेटचे वाटप आदी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. माणुसकीची भिंत उभारून संस्थेने सामाजिक कार्याचा दीपस्तंभ उभा केला आहे. 

 धक्कादायक : म्हणून वडखळचा प्रवास नको म्हणतात 

या उपक्रमाचे नुकतेच उदघाटन करण्यात आले. या वेळी शिवसेना नेते डॉ. राजीव साबळे, सुप्रसिद्ध डॉक्‍टर मदन निकम, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानदेव पवार, उद्योजक संजयअण्णा साबळे, व्यापारी अध्यक्ष गिरीश वडके, कार्याध्यक्ष रामणारायन मिश्रा, विक्रांत गांधी, दिनेश मेहता, मराठा समाजाचे उपाध्यक्ष नरेंद्र जाधव, बशीर करेल, रमेश जैन, मांगीलाल शेठ, हरिष शेठ, प्रशाद धारिया, सुरेश जैन, कृष्णाभाई, राजन मेहता, सिद्धांत देसाई, शंकर भाई, नंदूभाई, अशोक जैन, ज्योती बुटाला, सचिन देसाई आणि संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण दळवी उपस्थित होती. 

हे वाच : वरंध घाट, तुळशी खिंडीचा मार्ग सुकर

माणगाव व्यापारी असोसिएशन विविध समाजोपयोगी क्षेत्रात काम करते. समाजातील गरजू व्यक्तींना मदत मिळावी यासाठी माणुसकीची भिंत उभारली आहे. यामुळे मदत पोहोचेल आणि संघटनेचे सामाजिक कार्य गरजूंपर्यंत पोहोचेल, यापुढेही अशा अनेक संकल्पना संघटनेमार्फत राबविल्या जाणार आहेत. 
- लक्ष्मण दळवी, अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन, माणगाव 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The wall of humanity created a miracle