"सरकारला संवेदनशीलता शिकवावी लागेल, वेळ पडल्यास टोकाचा संघर्ष करू" : फडणवीस  

सुमित बागुल
Tuesday, 15 December 2020

"जोपर्यंत आपले प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही देखील सरकारला रोज प्रश्न विचारात राहू" - फडणवीस

मुंबई : महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील आझाद मैदानात जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेतली. मराठा आरक्षणाप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांशी संवाद साधला. सरकारला संवेदनशीलता शिकवावी लागेल. दरम्यान, वेळप्रसंगी टोकाचा संघर्ष  करावा लागला तर टोकाचा संघर्ष करू असं फडणवीस म्हणालेत. 

सरकारला संवेदनशीलता शिकवावी लागेल : 

आझाद मैदानात देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतली. यावेळी फडणवीस म्हणालेत की, "आज विधानसभेत मी मराठा आरक्षणाचा विषय मांडला, तर विधानपरिषदेत प्रवीण दरेकरांनी हा विषय मांडला. आम्ही सरकारला सांगितलं आहे की याची केवळ आणि केवळ जबाबदारी तुमची आहे, त्यामुळे तुम्हालाच इथून मार्ग काढावा लागेल. शेवटी सरकार सरकार असतं, सरकारची स्वतःची शक्ती असते. न्यायालयाचे अधिकार आहेत, ते सर्वोच्च आहेत, त्यावर कुणीही नाही. मात्र, तरीही संविधानाने सरकारला विशेष अधिकार दिलेले आहे. जर सरकारने मनात आणलं तर काहीना काही मार्ग नक्की काढू शकतं. मात्र दुर्दैवाने सरकारच्या वतीने टोलवा टोलवीशिवाय दुसरं काहीही होताना दिसत नाही". 

महत्त्वाची बातमी : मला पाडून दाखवा, भर सभागृहात अजित पवारांनी स्वीकारलं मुनगंटीवारांचं चॅलेंज

पुढे फडणवीस म्हणालेत की, "मी आपल्याला एवढंच सांगण्यास आलेलो आहे की, आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत. जोपर्यंत आपले प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही देखील सरकारला रोज प्रश्न विचारात राहू, सरकारकडे पाठपुरावा करू आणि सरकारला चांगले पर्याय देखील सुचवू. मराठा समाजाचा प्रश्न आमच्यासाठी राजकारणाचा प्रश्न नाही. आम्हाला विरोधाला विरोध करायचा नाही. हा आमच्या तरुणांचा प्रश्न आहे, म्हणून यामध्ये काय ऑप्शन्स आम्हाला दिसतात ते देखील सरकारला सांगू. सरकारला आमचे ऑप्शन स्वीकारायचे नसल्यास त्यांनीच ऑप्शन्स काढावेत. ज्यांची सगळी प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आपल्यापैकी अनेकांनी काहीनाकाही स्वप्न पहिली असतील. एका दिवसात स्वप्नाचा स्वप्नाचा चुराडा झाल्यानंतर आपल्या मनावर कसा आघात होतो हे आम्हाला समजू शकतं. म्हणून सरकारला संवेदनशीलता शिकवावी लागेल. विरोधीपक्ष म्हणून आम्ही त्यामध्ये कुठेही मागे जाणार नाही. टोकाचा संघर्ष  करावा लागला तर टोकाचा संघर्ष करू. " 

मुंबई, नवी मुंबई, ठाणे , कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, वसई विरारच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा  ।  Marathi News From Mumbai

एकंदरच आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावरील मराठा आंदोलकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. 

we will fight till the end devendra fadanvis met maratha agitators at aazad maidan


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: we will fight till the end devendra fadanvis met maratha agitators at aazad maidan