कोरोनामुळे विणकामगारांचा जगण्याचा संघर्ष सुरूच; उत्सव बंद असल्याने व्यवसायावर परिणाम!

नीलेश मोरे : सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 August 2020

कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनचा परिणाम विणकाम करणाऱ्या कामगारांवरही झाला आहे. अर्थार्जनाचे सर्वच मार्ग बंद झाल्याने मुलाबाळांचे उदर भरण कसे करावे, या विवंचनेत घरातील कर्तापुरुष पडला आहे. त्यामुळे अशा स्थितीत सरकार आपल्याला काहीतरी मदत करेल, या अपेक्षेवर ते येणारा दिवस ढकलत आहेत. 

घाटकोपर : कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनचा परिणाम विणकाम करणाऱ्या कामगारांवरही झाला आहे. अर्थार्जनाचे सर्वच मार्ग बंद झाल्याने मुलाबाळांचे उदर भरण कसे करावे, या विवंचनेत घरातील कर्तापुरुष पडला आहे. त्यामुळे अशा स्थितीत सरकार आपल्याला काहीतरी मदत करेल, या अपेक्षेवर ते येणारा दिवस ढकलत आहेत. 

कोरोनामुळे सण-उत्सवासह छोट्या-मोठ्या व्यवसायांवरही मोठा परिणाम झाला आहे. घरकाम व लहानसहान व्यवसाय करणाऱ्यांची तर उपासमार सुरू आहे. भटक्‍या जमातीवरही लॉकडाऊनचा मोठा परिणाम झाला आहे. भटक्‍या समाजातील विणकाम करणाऱ्यांची सध्याची अवस्था खूपच बिकट बनली आहे. त्यांचा दोऱ्या विणणे हाच मुख्य व्यवसाय आहे. काही लोक कानातील मळ साफ करणे, घरोघरी जाऊन वस्तू विकणे आदी व्यवसाय करतात. कोरोनामुळे त्यांचे खूपच हाल सुरू आहेत. चार महिने घरातच बसून असल्याने दोन वेळच्या जेवणाचीही अडचण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दोऱ्या विणण्याचा व्यवसाय असल्याने शहरात त्यांना "रशीवाला समाज' म्हणून ओळखले जाते. दर वर्षी दहीहंडी, गणेशोत्सवासाठी दोन महिने आधीच या कामाला हे लोक सुरुवात करतात; मात्र यंदा कच्चामाल खरेदीच करता न आल्याने व दहीहंडी उत्सवही रद्द झाल्याने त्यांचा रोजगार हिरावला आहे, अशी प्रतिक्रिया उमेश पवार यांनी दिली. 

रशीवाला समाजाकडून विणलेला माल खरेदी करून व्यापारी जादा भावाने तो माल विक्रीसाठी नेतात. दहीहंडीसाठी लागणाऱ्या एका शिक्‍क्‍याची किंमत बाजारात 50 रुपये आहे. व्यापाऱ्यांना आम्ही 250 ते 300 रुपये डझन भावात विकतो. मुंबईत मोठ-मोठ्या दहीहंडी असणाऱ्या परिसरात आम्ही या रशी विकतो; मात्र लॉकडाऊनमध्ये कुठे जाता येत नाही. रशीची विक्री होत नसल्याने आमची उपासमार सुरू आहे. 
- उमेश पवार, कामगार 

-------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weavers starve due to lockdown; Who will sell the ropes as the festival is closed?