'तांडव' विरोधात भाजप पुन्हा आक्रमक, ठिय्या आंदोलन करणाऱ्या राम कदम पोलिसांच्या ताब्यात

निलेश मोरे
Tuesday, 19 January 2021

आज घाटकोपर पोलिस ठाण्यावर आमदार राम कदम यांनी मोर्चा काढत पोलिस ठाण्याबाहेर तीन तास ठिय्या आंदोलन केले.

मुंबईः अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेल्या 'तांडव ' या वेब सिरीज विरोधात भाजप नेते राम कदम आक्रमक झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून तांडव वेब सिरीजच्या निर्माते, दिग्दर्शक, अभिनेता यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक शिक्षेच्या मागणीसाठी आज घाटकोपर पोलिस ठाण्यावर आमदार राम कदम यांनी मोर्चा काढत पोलिस ठाण्याबाहेर तीन तास ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणी शंख वाजवून राज्य सरकार विरोधात घोषणा देणाऱ्या राम कदम यांना तीन तासानंतर घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेतले. तांडव वेब सिरीज प्रसारित करणाऱ्या निर्मात्यावर कारवाई करण्यास मुंबई पोलिस तयार आहेत.  मात्र राज्य सरकार पोलिसांना कारवाई करण्यापासून रोखत असल्याचा सनसनाटी आरोप आमदार राम कदम यांनी केला आहे. 

महाविकास आघाडी सरकार हिंदू विरोधी

महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळख असताना या भूमीत पालघरमध्ये हिंदू सांधुची निर्घृण हत्या झाली होती. त्या साधूंना देखील महाविकास आघाडीमधील हिंदुत्व असल्याचा आव आणणाऱ्या शिवसेनेने न्याय दिला नाही. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तांडव वेब सिरीजमध्ये भगवान शंकर आणि राम यांच्यावर आक्षेपार्ह संभाषण करून देवतांचा अपमान करणाऱ्या तांडव वेब सिरीजच्या निर्मात्यावर आम्ही दोन दिवसांपासून घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहोत. मात्र राज्य सरकार हा गुन्हा दाखल करून घेत नाही आणि मुंबई पोलिस गुन्हा दाखल करण्यास तयार असताना सरकार त्यांच्यावर दबाव आणत असल्याचा आरोप करत महाविकास आघाडी सरकार हे हिंदू विरोधी सरकार असल्याचे आमदार राम कदम प्रतिक्रिया देताना म्हणाले. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

राज्य सरकार विरोधात घोषणा देणाऱ्या आमदार राम कदमांना पोलिसांनी घेतले ताब्यात

तांडवमधील आक्षेपार्ह संभाषण करून हिंदू देवतांचा अपमान केल्या प्रकरणी वेब सिरीजच्या निर्मात्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आज पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं. राज्य सरकार विरोधात शंख वाजवत घोषणा देणाऱ्या आमदार राम कदम यांना  पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना एक तासानंतर सोडले. यावेळी पोलिस राज्य सरकारकडून कायद्याचा सल्ला घेऊन आम्ही पुढची कारवाई करू असे उडवाउडवीची उत्तरे पोलिस आम्हाला देत आहे. मात्र तरीही राज्य सरकारने दोन दिवसात निर्मात्यावर गुन्हा दाखल न केल्यास पुन्हा आक्रमक भूमिकेत आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी आमदार राम कदम यांनी दिला. 

उत्तर प्रदेश मध्ये गुन्हा दाखल मग महाराष्ट्रात का नाही?

तांडव वेब सिरीजच्या निर्मात्यावर उत्तर प्रदेश सरकारने प्रकरण समजून घेत गुन्हा दाखल केला आहे. मात्र राज्यात तांडव वेब सिरीज प्रदर्शित होऊन देखील राज्य सरकार गुन्हा दाखल करून घेत नाही. संतांचा वा देवतांचा अपमान हा काही किरकोळ अपमान वाटतो का सरकारला. या आंदोलनाला भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा ही उपस्थित होते.

हेही वाचा- Corona Vaccination: मुंबईत आजपासून पुन्हा कोरोना लसीकरणास सुरुवात

----------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

web series Tandav Ram Kadam hunger strike outside Ghatkopar police station


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: web series Tandav Ram Kadam hunger strike outside Ghatkopar police station