#BLOG : काय चाललेय जगात? भाग 3

#BLOG : काय चाललेय जगात? भाग 3

ब्रिटन - आकड्यांचा गोंधळ


ब्रिटनमधील कोरोनाबळींचा आकडा १३ एप्रिल रोजीच बारा हजारच्या पार गेला असे सांगण्यात येते. प्रत्यक्षात हा आकडा याहून अधिक असण्याची शक्यता आहे. 3 एप्रिलला ब्रिटनने देशातील कोरोनाबाधितांची संख्या चार हजार 93 असल्याचे सांगितले, पण राष्ट्रीय सांख्यिकी संस्थेने हीच संख्या सहा हजारपेक्षा जास्त असल्याचे सांगितले. म्हणजे त्यावेळी जाहीर आकडेवारीपेक्षा 52 टक्के जास्त. तेव्हा संशयाला जागा आहेच. शिवाय ही आकडेवारी केवळ कोरोनावरील उपचारांसाठी नेमलेल्या रुग्णालयांतीलच आहे. कम्युनिटी तसेच केअर होम्समधील कोरोनाबळींची आकडेवारी किती हे नेमके समोर येत नाही. 
गार्डियन या तेथील प्रतिष्ठित दैनिकाला मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ब्रिटनमधील दोन प्रमुख केअर होममध्ये 521 जणांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. केअर होममधील रुग्णांची तसेच मृतांची नोंद होण्यास उशीर होतो. ती आकडेवारी आठवड्याची असते. कोरोनाची तीव्रता कमी होत आहे वा नाही हे तपासण्याचा योग्य मार्ग रुग्णांच्या तसेच मृतांच्या संख्येचे प्रमाण असते. मात्र ब्रिटनमध्ये नेमका हाच आकडा उपलब्ध होत नाही. काहींच्या मते रुग्णालयांद्वारे दिल्या जाणा-या मृत्यूच्या दाखल्यातही अनेकदा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू असे नमूद केलेले नसते. अशा सर्व गोंधळामुळे ब्रिटनमधील कोरोनाची तीव्रता नेमकी किती हे लक्षात येण्यास अजूनही वेळ लागण्याची शक्यता आहे.   


कोरोना आहे... झाडे तोडा!
ब्राझीलमध्ये कोरोनाविरुद्धची लढाई सुरु आहे. सर्व यंत्रणेचे त्याकडे लक्ष आहे. त्याचवेळी मार्चमध्ये अवैध जंगलतोड वाढली आहे. गतवर्षीच्या मार्चच्या तुलनेत यावेली 30 टक्के झाडे जास्त कापली गेली. एवढेच नव्हे तर तीन महिन्यात हे प्रमाण चांगलेच वाढले आहे. एकट्या अॅमॅझॉनमध्ये तीन महिन्यात 798 चौरस मीटर परिसरातील झाडांची कत्तल झाली. या जागेत अख्खे न्यूयॉर्क शहर सहज सामावेल. यावरुन किती मोठ्या प्रमाणावर हे काम सुरु आहे हे लक्षात यावे. 
ब्राझीलमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण 28 फेब्रूवारीस आढळला. तो अॅमेझॉनमध्ये मार्चच्या मध्यास पोहोचला. तेंव्हापासून कोरोनाची साथ आटोक्यात आलेली नाही. रुग्णांची संख्या नऊशेच्या पार गेली आहे. आता उपचार क्षमता संपली असल्याचे सांगितले जात आहे.  त्यामुळे ब्राझीलमधील सर्व कामे थंडावली आहेत, पण त्यास अपवाद आहे तो जंगल छाटणीचा. सगळ्या उद्योगात मंदी आहे, पण झाडे तोडण्यात चांगलीच तेजी आहे, अशी टिप्पणी पर्यावरण तज्ज्ञ करीत आहेत. हे रोखण्यासाठी तुटपुंजे कर्मचारी पाठवले जातात, पण हे रोखणे त्यांच्या आवाक्याबाहेरच आहे.
ब्राझीलमध्ये मंदी घोंघावत आहे. अनेकांच्या डोक्यावर नोकरी गमावण्याची टांगती तलवार आहे. या परिस्थितीत झटपट पैसा देणाऱ्या या झाडांच्या कापणीस जास्तच वेग येऊ शकेल असा इशारा दिला जात आहे. साडेतीन आठवड्यांच्या सामाजिक विलगीकरणानंतर ही अवस्था आहे. ते लांबल्यास काय होईल, अशी विचारणा होत आहे. ब्राझीलच्या अध्यक्षपदी जेअर बोल्सोनारो आल्यापासून अवैध झाडे कापण्यास संरक्षणच मिळाल्याचा आरोप केला जात आहे. हे असेच सुरु राहिल्यास त्याचा भविष्यात पावसावर परिणाम होईल.

अमेरिकेची पीछेहाट
कोरोना दारावर टकटक करीत असतानाही अमेरिकेने त्यास गांभिर्याने घेतले नाही. चाचण्यांत गोंधळ आहे. रुग्णालयात उपचारासाठी पुरेशा सुविधा नाहीत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अमेरिका सक्षमच नाही. हे मत आहे वॉशिंग्टनमधील मायक्रोबायोलॉजिस्ट डेव्हीड सारोकीन यांचे. कोरोनाची साथ रोखण्याच्या लढ्यात अमेरिका आघाडीच्या सहा देशांत सर्वांत मागे आहे. अमेरिकेत भले जगातील सर्वोत्तम तज्ज्ञ असतील, सर्वोत्तम यंत्रणा असतील, पण त्यांच्याकडे योग्य तयारीचा अभाव आहे. देशातील सर्वोच्च नेत्यांकडे दीर्घकालीन योजना आखण्याची दृष्टीच नसल्याने हे घडले आहे, अशी टिप्पणी सँन फ्रान्सीस्कोतील प्राध्यापक अॅरॉन बेल्कीन यांनी केली आहे. अमेरिकेत कोरोना आल्यानंतर तब्बल सहा आठवड्यांनी त्याचा सामना करण्यासाठी प्रशासन सरसावले. तोवर कोरोनाचा धोका कसा कमी आहे असेच ते सांगत होते आणि आता अमेरिकी सरकार चीनला दोष देत आहे. सर्व काही लवकरच सुरळीत होईल असे सांगत आहेत. त्याच बेफिकीरीमुळे आता त्यांना मास्क वापरावा लागत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com