'या घोटाळेबाजांना कधी नोटीस पाठवणार?; मुंबईत वाटली पत्रकं

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

मुख्यमंत्री दुसऱ्यांना बोलतात 'कर नाही त्याला डर कश्याला' मग मुख्यमंत्र्यांनी ही आपल्या भ्रष्ट सहकाऱ्यांना 'क्लीन चिट' न देता त्यांचीही चौकशी करण्याची हिम्मत दाखवावीच अशी मागणी या अज्ञात पत्रकात करण्यात आली आहे.

मुंबई : 'या घोटाळेबाजांना कधी नोटीस पाठवणार? अशी विचारणा करणारी पत्रकं लालबाग-परळ भागात अज्ञात व्यक्तींकडून वाटण्यात आली.यातील काही पत्रकांचा खच लालबाग-परळच्या रस्त्यावर पडला आहे. रस्त्याने ये-जा करणारी लोकं मोठ्या कुतूहलाने ही पत्रकं वाचत असून ही पत्रकं नेमकी कुणी वाटली याची कोणालाच काही माहिती नाही.

नोटबंदी नंतर अमित शाह संचालक असलेल्या बँकेत 5 दिवसात 745 कोटी रुपये कसे जमा झाले,अवघ्या 50 हजार रूपयांच्या भांडवलावर सुरू झालेल्या जय शाह यांच्या धंद्याने 1 वर्षात 16 हजार पट नफा कसा मिळवला,प्रवीण दरेकरांचा "मुंबै बँक" घोटाळा भाजप प्रवेशानंतर विस्मरणात कसा गेला,अमृता फडणवीस संचालिका असलेल्या अक्सिस बँकेला पोलिसांची खाती कशी मिळाली,महाराष्ट्र सरकारने 200 कोटी रुपयांचा भूखंड तिरुपती बालाजी ट्रस्टला केवळ 1 रुपयामध्ये दिला त्याबदल्यात सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्नीला ट्रस्ट ने विश्वस्त पदी नेमलं या सर्व प्रश्नांसह ईडी या प्रकरणांची चौकशी का करत नाही याची उत्तरं मागण्यात आली आहेत.

मुख्यमंत्री दुसऱ्यांना बोलतात 'कर नाही त्याला डर कश्याला' मग मुख्यमंत्र्यांनी ही आपल्या भ्रष्ट सहकाऱ्यांना 'क्लीन चिट' न देता त्यांचीही चौकशी करण्याची हिम्मत दाखवावीच अशी मागणी या अज्ञात पत्रकात करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When will you send a notice to these scammers Sheets distributed in Mumbai