राज्यातील इतर 300 गडकोट-किल्ले संवर्धनाची जबाबदारी कोणाची? वाचा कोणत्या संघटनेने विचारला हा महत्वपुर्ण सवाल

कृष्ण जोशी
Sunday, 9 August 2020

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी महाराष्ट्रात असलेल्या चारशे गडकिल्ल्यांपैकी जेमतेम 100 किल्ल्यांचे विविध संस्थांमार्फत संवर्धन होत आहे. मग उर्वरित 300 किल्ल्यांच्या जपणुकीची जबाबदारी कोणाची असा प्रश्न सह्याद्री प्रतिष्ठानच्या श्रमिक धन्वंतरी यांनी उपस्थित केला आहे. 

मुंबई ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी महाराष्ट्रात असलेल्या चारशे गडकिल्ल्यांपैकी जेमतेम 100 किल्ल्यांचे विविध संस्थांमार्फत संवर्धन होत आहे. मग उर्वरित 300 किल्ल्यांच्या जपणुकीची जबाबदारी कोणाची असा प्रश्न सह्याद्री प्रतिष्ठानच्या श्रमिक धन्वंतरी यांनी उपस्थित केला आहे. 

शिवरायांचे आणखीही अनेक किल्ले आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यांमध्ये आहेत. महाराष्ट्रातील 400 पैकी 46 किल्ले राज्य पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत तर केंद्रीय पुरातत्व खात्याच्या ताब्यात 36 किल्ले आहेत. गडसंवर्धन चळवळीमुळे 52 गडांची अवस्था सुधारते आहे. मात्र उरलेल्या तीनशे किल्ल्यांची जबाबदारी कोणाची असा प्रश्नही त्यांनी केला. सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था गडकिल्ल्यांचे रुप बदलण्याच्या बाबतीत तज्ज्ञ मानली जाते. 

अरे देवा! मुंबईतला 'हा' भाग ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट, पालिकेची डोकेदुखी वाढणार?

गड-किल्ल्यांच्या संवर्धनाच्या विषयावर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आय़ोजित करण्यात आलेल्या ऑऩलाईन व्याख्यानमालेत धन्वंतरी बोलत होते. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांनंतर परराज्यातील किल्ले जपणुकीचे कामही आपल्याला हाती घ्यायचे आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या या किल्ल्यांचा पाया अद्याप मजबूत आहे, मात्र बुरुज व अन्य इमारतींची पडझड होत आहे. हा प्रत्येक दगड आपण जपला पाहिजे, अद्यापही किल्ल्यांची व्यवस्थित वर्गवारी झाली नाही, हे कामही आपण केले पाहिजे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. 

पुरातत्व विभागाच्या अटींचा आपल्याला त्रास होत असला तरी किल्ल्यांच्या जपणुकीसाठी ते नियम आवश्यक असल्याने ते पाळले गेलेच पाहिजेत. आपण उध्वस्त गडकिल्ले फक्त समाजमाध्यमांवर व्हायरल करतो, पण त्यातून किल्ल्यांचे संवर्धन होत नाही. त्यामुळे आपण सर्वांनी संवेदनशील होऊन किल्ल्यांची जबाबदारी घ्या, फक्त सरकारवर टीका करू नका. कोणा किल्ल्याची पडझड झाली तर त्याची छायाचित्रे काढून त्याची माहिती पुरातत्व विभागाला द्या. राज्यातला एकही किल्ला जागतिक वारसा यादीत नाही, राजस्थानचे काही किल्ले जागतिक वारसा यादीत आहेत, कारण त्यांचे व्यवस्थित जतन झाले आहे. तसे प्रयत्न आपणही केले पाहिजेत, असेही धन्वंतरी म्हणाले.

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who is responsible for conservation of other 300 forts in the state? Read this important question asked by which organization