उंबार्ली आगीची जबाबदारी कोणाची? वारंवारच्या घटनांमुळे वनसंपदा धोक्‍यात

उंबार्ली आगीची जबाबदारी कोणाची? वारंवारच्या घटनांमुळे वनसंपदा धोक्‍यात

कल्याण : डोंबिवलीलगत असलेल्या उंबार्ली टेकडीवरील वनसंपदा 9 डिसेंबरला लागलेल्या आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली. याच दिवशी कल्याण-शीळ रस्त्यावरील एका भंगार गोदामालाही आग लागली होती. तेथून अवघ्या काही अंतरावर असलेल्या या जंगलातही त्याच वेळी आगीचा भडका उडाला होता. त्यामुळे ही आग नेमकी कशी लागली, याची जबाबदारी कोणाची, असे अनेक प्रश्‍न निसर्गप्रेमींमधून उपस्थित केले जात आहेत. 

मागील चार वर्षांपासून डोंबिवली आणि परिसरातील काही निसर्गप्रेमी उंबार्ली परिसरात सातत्याने वृक्षारोपण करत आहेत. त्यांनी आतापर्यंत चार ते पाच हजार झाडे या ठिकाणी लावली होती; मात्र बुधवारच्या आगीत झाडांबरोबरच उंबार्ली परिसरात पसरलेले जंगलही नष्ट झाले आहे. बुधवारी दुपारी अडीच-तीनच्या सुमारास लागलेली ही आग विझवायला रात्रीचे नऊ वाजले होते. कच्चे रस्ते आणि अत्यंत चिंचोळे मार्ग असल्यामुळे अग्निशमन दलाची वाहने या ठिकाणी पोहोचण्यास अडचण आली होती. परिणामी या आगीची तीव्रता वाढत गेली. 

कोणतीही यंत्रणा सोबत नसताना या परिसरात राहणारे काही ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य यांनी ही आग विझवली. आगीमुळे परिसरातील 80 टक्के झाडे जळून खाक झाली असून अनेक पक्षी तसेच छोटे प्राणी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले.उंबार्ली टेकडीच्या एका बाजूला म्हाडाचे काम सुरू आहे. ही आग लागली असताना तेथे सुरुंग फोडले जात होते, अशी माहिती निसर्गप्रेमी मंगेश कोयंडे यांनी दिली. उंबार्ली टेकडीची मागील बाजू, खोणी, धामटन या ठिकाणी आगीचे प्रमाण अधिक होते. कोयंडे यांच्यासह आमोद वेंगुर्लेकर, शशिकांत कोकाटे, अनिल उद्देवार यांनी ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. वनखात्याचे या जंगलाकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

मागील चार-साडेचार वर्षांपासून या परिसरातील वनसंपदा टिकून राहावी, यासाठी प्रयत्न करत आहोत; मात्र मागील काही दिवसांपासून अनेकांनी या ठिकाणी अतिक्रमण करण्यास सुरुवात केल्यामुळे या जंगलाला धोका निर्माण झाला आहे. सरकारने वेळीच याकडे लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. 
- मंगेश कोयंडे,
निसर्गप्रेमी 

म्हाडा आणि वनखात्याची उंबार्ली येथे जागा आहे. वनखात्याने त्वरित येथे सर्वेक्षण करून संरक्षण भिंत उभी करणे आवश्‍यक आहे. याबाबत सरकारदरबारी योग्य तो पाठपुरावा केला जात आहे. म्हाडानेही या ठिकाणी निसर्गाचे रक्षण होईल, याची खबरदारी घ्यावी, ही अपेक्षा आहे. 
- राजू पाटील,
आमदार, कल्याण ग्रामीण

Who is responsible for Umbarli fire Frequent incidents endanger forest resources in kalyan

------------------------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com