कोकण रेल्वे नेमकी कुणासाठी ? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

रेल्वे प्रशासनाकडून कोकण रेल्वेच्या प्रवाशांच्या मागण्या मान्य होत नाहीत, याचा निषेध करण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने चक्क गांधीगिरीचा अवलंब करून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

ठाणे : गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची गावी जाण्याची लगबग सुरू असताना ठाणे स्थानकात कोकणवासीयांकडून रेल्वे प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध सुरू आहे. रेल्वे प्रशासनाकडून कोकण रेल्वेच्या प्रवाशांच्या मागण्या मान्य होत नाहीत किंबहुना त्यांना दुजाभावाची वागणूक मिळते. याचा निषेध करण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने चक्क गांधीगिरीचा अवलंब करून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. प्रवासी संघाच्या सदस्यांनी कोकण रेल्वे नक्की कुणासाठी? असा खरमरीत सवाल असलेले टी-शर्ट परिधान करून दररोज ठाणे स्थानकातील रांगा लावणाऱ्या प्रवाशांना मदतीचा विडा उचलला आहे. 

दिवंगत नेते मधु दंडवते यांनी कोकणवासीयांसाठी कोकण रेल्वे सुरू केली. मात्र, याचा फायदा जितका कोकणवासीयांना होतो, त्यापेक्षा अधिक दक्षिणेकडील प्रवाशांना होत असल्याचे वास्तव आहे. कोकणातील चाकरमानी कोकणकन्या, मांडवी, जनशताब्दी एक्‍स्प्रेस किंवा दादर-सावंतवाडी राज्यराणी (तुतारी एक्‍सप्रेस) या गाड्यांना प्राधान्य देतात. परंतु, कोकणकन्या आणि मांडवी एक्‍सप्रेस या गाड्यांना सुधारीत नवीन आसनव्यवस्थेची "एलएचबी' बोगी लावल्याने दोन जनरल डबे कमी झाले. त्यामुळे चाकरमान्यांची गैरसोय वाढून ठाणे स्थानकात प्रवाशांची झुंबड उडत आहे. या दोन्ही गाड्यांमधील अनारक्षित प्रवाशांसाठी मुंबई, दादर टर्मिनस येथील राखीव बोगी, महिलांसाठी असलेली बोगी रद्द केल्याचा फटका बसत आहे. 

सद्यस्थितीत गणेशोत्सवासाला जाण्यासाठी अनारक्षित डब्यांमध्ये जागा मिळवताना प्रवासी ठाणे स्थानकात दोन-तीन दिवस रांगा लावतात. कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संस्थेच्यावतीने या रांगेचे नियोजन केले जाते. कोकण रेल्वेच्या गाड्यांना लवकरात लवकर अनारक्षित डबे जोडावेत, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने रेल्वे प्रशासनाकडे केली होती. मात्र, प्रशासनाने वाहतुकीच्या नियोजनात बाधा निर्माण होत असल्याच्या भीतीने प्रवाशी संघाची मागणी धुडकावून लावल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 

कोकण रेल्वेचा मार्ग सुरू झाल्यानंतर कोकणात जाणाऱ्या एक्‍स्प्रेस हाताच्या बोटावर मोजण्या इतक्‍या आहेत. तुलनेत दक्षिणेकडे व इतरत्र जाणाऱ्या गाड्यांची सर्वाधिक असल्याने हा कोकणवासीयांवर अन्याय आहे. खेड, चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडी ते गोव्यातील थिवीम स्थानकापर्यंत तळ कोकणातील प्रवाशांसाठी गाड्या नसल्याने कोकणकन्या आणि मांडवी या दोनच एक्‍स्प्रेसवर ताण येतो. तेव्हा, स्थानकात रांग लावणाऱ्या प्रवाशांची मदत करताना प्रशासनाचा निषेध नोंदण्यासाठी संघाने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. 
-राजू कांबळे, 
कोकण रेल्वे प्रवाशी संघ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For Whom exactly Konkan Railway is