सत्तास्थापनेसाठी मिळालं भाजपला निमंत्रण; आज बैठक

प्रशांत बारसिंग
Sunday, 10 November 2019

सत्तास्थापनेचे निमंत्रण स्वीकारून भाजपने शपथविधीनंतर विश्‍वास मतास सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधात मतदान करणार आहे. शिवसेनेनेही विरोधात मतदान केले, तर त्यांच्याशी आघाडी करण्याचा विचार करायचा काय, यावर पक्ष निर्णय घेईल. 
- नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई : तेराव्या विधानसभेची मुदत आज संपल्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केले. राज्यपालांच्या या पत्रावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी भाजपने आज (ता. 10) कोअर समितीची बैठक बोलावली आहे. बैठकीनंतर सरकार स्थापन करण्याचा दावा करायचा किंवा नाही, याचा निर्णय घेण्यात येणार आहे. 

चौदाव्या विधानसभेसाठी राज्यात 21 ऑक्‍टोबरला मतदान होऊन 24 ऑक्‍टोबरला मतमोजणी झाली. विधानसभेचे निकाल जाहीर होऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रकाशित झाली आहेत. तरीही, सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाने दावा केला नाही. 

या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी घटनेतील तरतुदीनुसार विधानसभेत 105 आमदारांचे संख्याबळ असलेला सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपकडे पहिल्यांदा विचारणा केली आहे. सध्या भाजपकडे सरकार स्थापन करण्यासाठी लागणारे 145 आमदारांचे संख्याबळ नाही. मुख्यमंत्रिपदावरून वाद असल्याने शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या चर्चा बंद आहे. त्यामुळे बहुमत नसताना सरकार स्थापन करायचे की सरकार स्थापन करायला नकार द्यायचा, यावर भाजपला निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यासाठी उद्या कोअर समितीची बैठक होणार असल्याची माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

यापूर्वी 2014 मध्येही भाजपने अल्पमतातील सरकार स्थापन केले होते. सभागृहातील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी फडणवीस यांनी आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध केले होते. कालांतराने शिवसेनेने सत्तेत सहभागी होऊन भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र, यंदा शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरून ताठर भूमिका घेतल्याने भाजपची चांगलीच अडचण झाली आहे. त्यामुळे भाजपने सत्तास्थापनेसाठी पुढाकार घेतला नव्हता. परिणामी, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीविषयी अस्पष्टता निर्माण झाली आहे. विधानसभेत कुणीही बहुमत सिद्ध न केल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होण्याची शक्‍यता आहे. 

सरकार स्थापनेचा दावा केल्यास... 
भाजपने सरकार स्थापन करण्याचा दावा केल्यास राज्यपाल विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देतील. त्यानंतर भाजपला विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागेल. तत्पूर्वी, राज्यपाल आमदारांचा शपथविधी आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी तीन दिवसांचे अधिवेशन बोलावतील.

अधिवेशनापूर्वी राज्यपाल हंगामी अध्यक्षांची निवड करतील. हंगामी अध्यक्ष नवनिर्वाचित सर्व सदस्यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देतील. सर्व आमदारांचा शपथविधी झाल्यानंतर अध्यक्षपदासाठी निवडणूक होईल. एखाद्या आमदाराने शपथ घेतली नाही, तर त्याला अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा पराभव झाल्यास सरकारला राजीनामा द्यावा लागेल, अशी माहिती विधानमंडळातील सूत्रांनी दिली. 

सत्तास्थापनेचे निमंत्रण स्वीकारून भाजपने शपथविधीनंतर विश्‍वास मतास सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधात मतदान करणार आहे. शिवसेनेनेही विरोधात मतदान केले, तर त्यांच्याशी आघाडी करण्याचा विचार करायचा काय, यावर पक्ष निर्णय घेईल. 
- नवाब मलिक, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

Webtitle : will bjp accept invite of governor to form government in maharashtra


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: will bjp accept invite of governor to form government in maharashtra