मिरा-भाईंदर महापालिका करणार मालमत्ता कर माफ? महासभेत महत्वपुर्ण निर्णय अपेक्षित

संदीप पंडित
Wednesday, 12 August 2020

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत 500 चौ.फुटापर्यंतच्या मालमत्ता धारकांना मालमत्ता कर माफ करण्याचा तर 500 चौ.फुटापेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या मालमत्ता कर धारकांना मालमत्ता करात 50 टक्के इतकी सवलत देण्याचा निर्णय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

भाईंदर -  कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे मागील 4 महिन्यांच्या कालावधीत आर्थिक गर्तेत अडकलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. या नागरिकांना दिलासा देण्यासाठी उद्या 13 ऑगस्ट रोजीच्या मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत 500 चौ.फुटापर्यंतच्या मालमत्ता धारकांना मालमत्ता कर माफ करण्याचा तर 500 चौ.फुटापेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या मालमत्ता कर धारकांना मालमत्ता करात 50 टक्के इतकी सवलत देण्याचा निर्णय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तर पालिकेला यातून बाहेर निघण्यासाठी राज्य शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी आमदार गीता जैन यांनी शासनाकडे केली आहे.

नवी मुंबईतील खासगी रुग्णांच्या लुटमारीला महापालिकेचा चाप; आयुक्तांकडून कारवाईचा इशारा

मिरा भाईंदर शहरात साडे तीन लाखाहून अधिक मालमत्ताधारक आहेत. यापैकी 50 ते 60 हजार मालमत्ताधारक हे वाणिज्य कार्यक्षेत्रात मोडतात उर्वरित मालमत्ताधारक हे निवासी करदाते म्हणून ओळखले जातात. मिरा भाईंदर महानगरपालिकेने चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी 271 कोटींचे उत्पन्न अपेक्षिले आहे. मात्र, या मालमत्ता करांची बिले वर्षातून दोन वेळा काढली जात असून पहिल्याच सहामाही कराची बिले वितरणाअभावी मुख्यालयात धुळ खात पडून आहेत.

परप्रांतीयांना न्याय, कोकणावर अन्याय! विशेष रेल्वे गाड्यांचा मुद्दा जाणार 'राज' दरबारी!

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनाने मालमत्ता, पाणीपट्टी या विभागांसह सर्वच विभागातील कर्मचारी तथा अधिकारी वर्गांना याकामी जुंपले आहे. त्यामुळे मालमत्ता आणि पाणीपट्टी कराची वसूली केवळ ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारली जात आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यात मालमत्ता कराची वसूली केवळ दीड कोटी म्हणजेच 0.55 टक्के इतकीच झालेली आहे. पालिकेच्या उत्पन्नाचे महत्वाचे स्त्रोत असलेल्या या विभागाला अर्थकारणाच्या कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे पाणीपट्टीच्या ऑनलाईन वसूलीतून पहिल्या चार महिन्यातील 24 कोटींच्या उध्दीष्टापैकी 16 कोटीची म्हणजेच 67 टक्के इतकी वसूली झाली आहे. परंतु, दुसऱ्या टप्प्यातील पाणीपट्टींची बिले अदयापही कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे निघालेली नाहीत.

Corona Virus:ठाण्यातील परिस्थिती चिंताजनक, आता मिशन घोडबंदर

कोरोनामुळे मिरा भाईंदरकरांचे कंबरडे मोडले असून येथील नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना दररोज करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मिरा भाईंदर शहरातील 500 चौ.फुटापर्यंतचे क्षेत्रफळ असलेल्या झोपडी तथा सदनिकाधारकांना या चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करातून वगळण्यात येणार आहे. तर 500 चौ.फुटापेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या मालमत्ता कर धारकांना मालमत्ता करात 50 टक्क्यापर्यंतची सुट दिली जाणार आहे. ही सवलत केवळ या चालू आर्थिक वर्षापूर्तीच मर्यादित राहणार आहे. या कर सवलतीमुळे नागरिकांना चांगलाच दिलासा मिळणार असला तरी मिरा भाईंदर महानगरपालिकेचे कंबरडे आर्थिकदृष्ट्या मोडले जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या महानगरपालिकेला शासनाने आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी 145 मिरा भाईंदर विधानसभा क्षेत्रातील आमदार गीता जैन यांनी केली आहे.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Mira Bhayander Municipal Corporation waive property tax? Important decisions expected at the General Assembly