दोन दिवसांतच एसटीची व्हीटीएस सेवा ठप्प 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

या सेवेते दोन दिवसांपूर्वीच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते.

मुंबई : एसटीचे मुख्यालय असलेल्या मुंबई सेंट्रल बसस्थानकातील व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिमद्वारे (व्हीटीएस) राबवण्यात येणारी पॅसेंजर इन्फर्मेशन सिस्टीम (पीआयएस) सेवा ठप्प झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे मंगळवारीच (ता. 20) या प्रकल्पाचे लोकार्पण परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले होते. मात्र, अवघ्या दोन दिवसांतच एसटीच्या या व्हीटीएस यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. 

नाशिक विभागानंतर मुंबई-पुणे-मुंबई, बोरिवली-पुणे-बोरिवली, ठाणे-पुणे-ठाणे या मार्गांवर राज्य परिवहन विभागाने व्हीटीएस-पीआयएस प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुमारे सहा महिन्यांत ही यंत्रणा राज्यातील प्रत्येक एसटी बसमध्ये लागू करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकल्पाचे मंगळवारी परिवहन मंत्री रावते यांनी मंत्रालयातील दालनात लोकार्पण केले. मात्र, त्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच व्हीटीएस-पीआयएस प्रकल्प बंद झाल्याचे दिसून येत आहे.

स्थानकातील दोन्ही व्हीटीएस स्क्रीन बंद असल्याने प्रवाशांना या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. तसेच प्रवाशांना नेहमीप्रमाणेच बसच्या 'लेट लतीफ'पणालाही सामोरे जावे लागत आहे. व्हीटीएस-पीआयएस प्रकल्पाच्या अंतर्गत मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे; तर व्हिडीओ वॉलच्या माध्यमातून बसचे निरीक्षण केले जाणार आहे. तसेच वाहनाचे निश्‍चित लोकेशन माहिती पडणार आहे. मात्र, मुंबई सेंट्रल बसस्थानकावरच सध्या व्हीटीएस सिस्टीमचे टीव्ही स्क्रीन बंद असल्याने एसटीच्या अत्याधुनिक प्रकल्पाचे तीनतेरा वाजले आहेत. 

स्थानकांवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे अद्याप व्हीटीएसच्या टीव्ही स्क्रीनचे केबल कनेक्‍शन केलेले नाही. लवकरच हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. 
- सुनील पवार, आगार व्यवस्थापक, मुंबई सेंट्रल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Within two days, STs VTS service shuts down