दोन दिवसांत नवी मुंबईतील हजार खड्डे बुजवले

शहरात युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे
शहरात युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे

नवी मुंबई : पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शहरभर पडलेले खड्डे बुजवण्याच्या कामाला आता वेग आला आहे. शनिवार (ता. २८) आणि रविवार (ता. २९) असे दोन्ही दिवस महापालिकेला सुट्टी असतानाही अभियांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यांवर उभे राहून, तब्बल एक हजारपेक्षा जास्त खड्डे बुजवल्याची नोंद ऑनलाईन प्रणालीत झाली आहे. 

या बुजवलेल्या खड्ड्यांची फोटोसह माहिती दक्ष या ऑनलाईन प्रणालीवर अपलोड केली जात आहे. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या निर्देशांमुळे अभियांत्रिकी विभागामार्फत शहर अभियंते सुरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळा संपण्याच्या तोंडावर असताना परतीच्या पावसाने शहराला पुन्हा एकदा चांगलेच झोडपून काढले होते. त्यामुळे गणेशोत्सवासाठी बुजवलेले खड्डे उखडून वाळू व खडी रस्त्यावर येऊन खड्डे उघडे पडले होते. वाशी उड्डाणपुलाखाली, वाशी रेल्वे स्थानकासमोरील सेक्‍टर ३० येथील रस्ता, सीवूड्‌स, नेरूळ, सीबीडी उड्डाणपुलाखाली, सानपाडा रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे अनेक वाहनचालकांकडून शारीरिक व्याधींचा त्रास होत असल्याची ओरड होत होती; मात्र ‘सकाळ’ने शनिवारच्या अंकात खड्डेमय रस्त्यांवर प्रकाश टाकल्यानंतर शनिवार आणि रविवार असे दोन दिवस महापालिकेचा अभियांत्रिकी विभाग झपाटून कामाला लागला आहे. 

शनिवारी आणि रविवारी असे दोन्ही दिवस अभियांत्रिकी विभागातर्फे सीबीडीमध्ये सिडको भवनमागील रस्ता, नेरूळमध्ये सेक्‍टर ५० जंक्‍शन, एलॲण्डटी उड्डाणपुलाखाली, सानपाडा सेक्‍टर १० डी-मार्टजवळ, वाशीला सायन-पनवेल महामार्गवरील उड्डापुलाजवळ, कोपरखैरणे तीन-टाकी रस्ता, सेक्‍टर १९ आणि कोपरखैरणे रेल्वे स्थानक रस्ता, ऐरोलीत मुलुंड उड्डाणपुलाकडे जाणारा टी जंक्‍शन रस्त्यावरील, युरो स्कूल जंक्‍शन, पटनी रोड येथील खड्डे बुजवण्यात आले आहेत.

शहराची प्रतिमा मलीन
सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी येथील उड्डाणपूल, नेरूळ उड्डाणपूल, वाशी उड्डाणपुलाखाली, वाशी गाव व टोल नाका या ठिकाणचा रस्ता खड्डेमय  झाला आहे. या रस्त्यावर शुक्रवारी (ता. २७) झालेल्या वाहतूक कोंडीमुळे एका प्रवाशाने ट्विटर फोटो टाकून संदेश टाकला होता. त्यावर नवी मुंबईच्या पोलिसांनी संदेश देत ही वाहतूक कोंडी खड्ड्यांमुळे झाल्याचे स्पष्ट केले. या प्रकाराची चर्चा एका रेडिओवरील एफएम स्टेशनवर झाली. त्यामुळे सायन-पनवेल महामार्गावरील या खड्ड्यांमुळे नवी मुंबई महापालिकेची प्रतिमा मलीन होत आहे.

रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी अभियांत्रिकी विभागातील सर्व अभियंत्यांची एक बैठक घेऊन तत्काळ सर्व खड्डे बुजण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच खड्डे न बुजवणाऱ्या कंत्राटदारांना दंड आकारण्यात येणार होता. त्यामुळे येत्या काही दिवसांत उर्वरित सर्व खड्डे बुजवण्यात येणार आहेत.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com