कार्यादेशाअभावी जनसुविधांच्या कामांना ब्रेक

प्रमोद जाधव : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण विकास विभागाकडून जनसुविधांच्या कामांसाठी विशेष अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

अलिबाग : ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण विकास विभागाकडून जनसुविधांच्या कामांसाठी विशेष अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील ३२० कामांना मंजुरी मिळाली. या कामांसाठी ११ कोटी रुपयांचा निधी सरकारने जिल्हा नियोजन विभागाकडे वर्ग केला आहे. त्यातील ७९ कामांना जिल्हा परिषदेकडून कार्यादेश मिळाला असून ३ कोटी ४ लाख रुपयांचा निधी वर्गही करण्यात आला. मात्र, २४१ कामांना जिल्हा परिषदेकडून कार्यादेश मिळाला नसल्याने त्यांना ब्रेक लागला आहे.

ग्रामीण भागात दफन, दफनभूमीची व्यवस्था करणे, त्या सुव्यवस्थित ठेवणे, त्याचे नियमन करणे, चबुतऱ्याचे बांधकाम करणे, शेडचे बांधकाम करणे, पोहोच रस्ता, स्मशान घाट, नदी घाट बांधकाम, जमीन सपाटीकरण व तळ फरशी, स्मृती उद्यान, ग्रामपंचायत भवन बांधणे, इमारती अंतर्गत सुविधा पुरविणे, जुन्या ग्रामपंचायत इमारतीची पुनर्बांधणी व विस्तार करणे, ग्रामपंचायत आवारात वृक्षारोपण करणे, परिसर सुधारणा, परिसराला कुंपण घालणे, ग्रामपंचायत हद्दीत आठवडा बाजार केंद्र विकसित करणे, तलावांमधील गाळ काढून सुशोभीकरण करणे, घनकचरा व्यवस्था करणे, भूमिगत गटार बांधणे, ग्रामपंचायत हद्दीमध्ये अस्तित्वात असलेल्या विहिरींवर सौर ऊर्जेवर आधारित दुहेरी हातपंप बसवणे, तसेच जलशुद्धीकरण, आरओ प्लांटची व्यवस्था करणे, गावांतर्गत रस्ते, एक वस्ती, पाड्यापासून दुसऱ्या वस्ती, पाड्यापर्यंत जोड रस्ता बांधणे अशा अनेक विकासकामांसाठी जन सुविधांतर्गत ग्रामपंचायतीला विशेष अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार परिपत्रक काढण्यात आले. जिल्ह्यामध्ये एकूण ३२० कामांना मंजुरी मिळाली असून, ७९ कामांना जिल्हा परिषदेकडून कार्यादेशही मिळाले आहेत. मात्र, रायगड जिल्हा परिषदेकडून उर्वरित कामांसाठी कार्यादेश मिळाला नसल्याने २४१ कामांना ब्रेक लागला आहे. त्यामुळे ८ कोटी १८ लाख रुपयांचा निधी पडून आहे. 

जन सुविधेंतर्गत सरकारकडून ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. जिल्हा परिषदेकडून ज्या कामांचे कार्यादेश मिळाले, त्या कामांचा निधी वर्ग केला आहे. उर्वरित कामांना कार्यादेश न मिळाल्याने निधी देता येत नाही. 
- सुनील जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी

जिल्ह्यातील कामांवर दृष्टिक्षेप 
तालुके   -  मंजूर कामे  -  कामाची रक्कम (रुपये)
अलिबाग  -  ३८  -  एक कोटी ३२ लाख ४१ हजार 
पेण  -  ४७  -  एक कोटी ५५ लाख ३७ हजार 
पनवेल   -  ११  -  ७५ लाख ९९ हजार 
उरण  -  ११  -  ४९ लाख ८० हजार 
कर्जत  -  ३४  -  एक कोटी ७६ लाख ९७ हजार 
खालापूर   - १५  -  ५९ लाख ९६ हजार 
रोहा  -  ४८  -  एक कोटी ४४ लाख ५२ हजार 
माणगाव  -  ३५  -  एक कोटी ७५ हजार 
महाड  -  ६  -  १६ लाख ४० हजार 
श्रीवर्धन  -  १९  -  ५५ लाख ९० हजार 
म्हसळा  -  १३  -  ३५ लाख  १० हजार 
पोलादपूर   - ५  -  १५ लाख 
सुधागड  -  ६  -  १७ लाख ८० हजार 
मुरूड   -  २२  -  ५८ लाख २९ हजार 
तळा  -  १०  -  २८ लाख 
एकूण  -  ३२०  -  ११ कोटी २२ लाख 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Without work order development works are pending