esakal | कर्जदाराची हत्या केल्याप्रकरणी महिलेला जन्मठेप
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

कर्जदाराची हत्या केल्याप्रकरणी महिलेला जन्मठेप 

कर्जदाराची हत्या केल्याप्रकरणी महिलेला जन्मठेप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


ठाणे : हजारो रुपये उसने घेऊन वारंवार मागणी केल्यानंतरही परत न केल्याच्या रागातून कर्जदाराच्या डोक्‍यात दगड टाकून त्याची निर्घृण हत्या करणाऱ्या महिलेला न्यायालयाने जन्मठेप आणि 25 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. गीता जयस्वाल असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. ठाणे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. दरम्यान, या प्रकरणातील दुसरा आरोपी सोत्री यादव याचा निकालाच्या चार दिवस अगोदरच मृत्यू झाला होता.

कर्जदार मृतक रामपाल गुप्ता आणि आरोपी गीता जयस्वाल आणि सोत्री यादव हे सगळे नवी मुंबईतील रबाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहत होते. मृतक रामलाल गुप्ता यांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्याने अनेकवेळा हजारो रुपयांचे कर्ज गीता जयस्वाल हिच्याकडून घेतले होते. मात्र, पैसे परत करण्यास असमर्थ ठरलेल्या गुप्ता याची 10 आक्‍टोबर 2013 रोजी आरोपी गीता जयस्वाल हिने सोत्री यादव याच्या मदतीने रागाच्या भरात डोक्‍यात दगड घालून हत्या केली होती.

याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली होती. काही काळानंतर दोघांचीही जामिनावर सुटका झाली होती. सदर हत्या प्रकरण अंतिम सुनावणीसाठी ठाणे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात आले होते.

दरम्यान, या प्रकरणातील दुसरा आरोपी सोत्री यादव याचा निकालापूर्वीच मृत्यू झाला. सरकारी वकील विवेक कडू यांनी या प्रकरणात 13 साक्षीदारांची साक्ष नोंदविली. न्यायालयात सादर साक्षीपुरावे ग्राह्य धरीत न्यायमूर्ती जाधव यांनी आरोपी गीता जयस्वाल या महिलेला जन्मठेप आणि 25 हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली.

loading image
go to top