
भिवंडीतील काल्हेर गावात घरात घुसून अनोळखी व्यक्तींनी महिलेवर बेछूट गोळीबार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावात गेल्या आठवड्यात शिवसेना शाखाप्रमुखावर राजकीय वादातून गोळीबार झाल्याची घटना ताजीच असताना, आज सकाळी गावातील एका घरात घुसून अनोळखी व्यक्तींनी महिलेवर बेछूट गोळीबार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला. या हल्ल्यात सदर महिला जखमी झाली असून, तिला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जयश्री देडे (38) असे या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे करीत आहेत.
काल्हेर गावातील जयदुर्गा अपार्टमेंटमध्ये ही घटना आज सकाळी 10 ते 11च्या सुमारास घडली. महिलेचे पती शिवराम हे कामावर आणि मुलगा बाहेर गेला होता. त्यामुळे ही महिला घरी एकटीच होती. सकाळी दोघे अनोळखी व्यक्ती महिलेच्या घरी आले आणि त्यांनी महिलेवर गोळीबार केला. त्याचा आवाज बाहेर उभ्या असलेल्या मुलाने ऐकताच तो आपल्या मित्रासह घरात येत असतानाच जयश्री यांची हल्लेखोरांबरोबर झटापट झाली. यात हल्लेखोरांनी झाडलेल्या दोन गोळ्यांपैकी एक गोळी त्यांच्या डोक्यास लागली. यावेळी मुलगा व मित्राने हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना ढकलून हल्लेखोर पसार झाले.
मुंबई, भिवंडी परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
जयश्री यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थीर आहे. गोळीबारीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त योगेश चव्हाण, एसीपी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गोळीबार नेमका राजकीय वादातून अथवा कोणत्या कारणासाठी करण्यात आला हे आरोपी पकडल्यानंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
Woman shot dead in Bhiwandi admitted to private hospital for treatment
---------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )