लोकलमध्ये धक्का लागल्याने महिलेने, घेतला महिलेचा चावा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

संबधित महिला कामावरून घरी परतत असताना प्रभादेवी ते दादर दरम्यान हा प्रकार घडला.

मुंबई : पश्‍चिम रेल्वेवरील लोकलच्या महिला डब्यात प्रवास करणाऱ्या एका महिलेला महिला सहप्रवाशाचा धक्का लागल्याने थेट चावा घेत नखाने ओरबडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी (ता. 16) सायंकाळी कामावरून घरी परतत असताना प्रभादेवी ते दादर दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी पीडित महिलेने रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिस याबाबत अधिक तपास करत आहे. 

सांताक्रूझ येथील नजराना पिल्ले (35) यांनी सोमवारी सायंकाळी लोअर परळ स्थानकातून बोरिवली धीमी लोकल पकडली. दरम्यान, गर्दी असल्याने महिला प्रवाशांना धक्का लागला. त्यामुळे आरोपी महिलेने माझ्या बरगडीवर जोरदार धक्का दिला. मी विरोध करताच त्या महिलेने हात मुरगळत नखाने ओरबडल्याचे नजराना यांनी सांगितले.

दरम्यान, सदर प्रकरण रेल्वे पोलिसांकडे नेताना झालेल्या झटापटीत 9 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी हरवली. अखेर नजराना यांनी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र ही घटना प्रभादेवी ते दादर या दरम्यान घडल्याने तक्रार मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The woman took the bite of the woman due to rush in local train