
आज जगातील कोणतेही काम स्त्रियांना अशक्य नाही, असे म्हटले जाते तरीही महाराष्ट्रातील गृहिणींचे अजूनही रोजचे किमान चार तास स्वयंपाक आणि मुलांच्या संगोपनात जातात. त्यामुळे त्यांना स्वतःची आवड जोपासण्यास जेमतेम अर्धा तासच मिळतो, असे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे.
मुंबई ः आज जगातील कोणतेही काम स्त्रियांना अशक्य नाही, असे म्हटले जाते तरीही महाराष्ट्रातील गृहिणींचे अजूनही रोजचे किमान चार तास स्वयंपाक आणि मुलांच्या संगोपनात जातात. त्यामुळे त्यांना स्वतःची आवड जोपासण्यास जेमतेम अर्धा तासच मिळतो, असे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे.
पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर आणि औरंगाबाद या राज्यातील दहा शहरांमधील 1200 महिलांना विविध प्रश्न विचारून हे सर्वेक्षण करण्यात आले. रोजच्या स्वयंपाकातील वेळ वाचवून तो आवडीच्या कामासाठी वापरण्यास आपल्याला आवडेल, असे या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 60 टक्के महिलांनी सांगितले. त्यात कुटुंबियांकडून प्रोत्साहन व पाठिंबा अपेक्षित आहे, असेही 37 टक्के महिलांचे म्हणणे आहे.
राज्यातील 40-45 वयोगटातील 61 टक्के महिलांचा दिवसातील जास्तीत जास्त वेळ घरगुती कामांमध्येच जात असतो. तरीही 60 टक्के महिलांना गृहिणीच्या जबाबदाऱ्यांखेरीज अन्य काहीतरी जबाबदारी पार पाडण्याची इच्छा आहे. स्वयंपाकघरात कमी वेळ घालवला तर तो वेळ वैयक्तिक आवडीनिवडी जोपासण्यासाठी वापरता येईल, असे नाशिकच्या 84 टक्के महिलांनी तर नागपूरच्या 31 टक्के महिलांनी सांगितले. सोलापूर व पुण्याच्या महिलांनीही त्याचीच री ओढली.
राज्यातील 80 टक्के महिला स्वतःच संपूर्ण स्वयंपाक करतात. कारण हा पर्याय त्यांना आरोग्यदायी वाटतो, आणि सध्या कोरोनाच्या फैलावाच्या काळात मदतनीसही नसल्याने महिलांचा जास्त वेळ स्वयंपाकघरातच जातो. पण या घरगुती कामातून 30 मिनिटे बाजूला काढता आली तर आपल्या आवडी जोपासता येतील. मात्र त्यासाठी 37 टक्के महिलांना कुटुंबियांकडून पाठिंबा हवा आहे, असेही आढळून आले.
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या शहरांत 21 ते 25 वयोगटातील 74 टक्के महिलांनी पुरुषांची मदत होते, असे सांगितले. 64 टक्के महिलांनी विवाहापूर्वी आपले करिअर, आवड, छंद यांना वेळ दिला होता. मात्र लग्नानंतर 54 टक्के महिलांनी कुटुंब तर 57 टक्के महिलांनी मुलांच्या संगोपनाला प्राधान्य दिले. जेमिनी कुकिंग ऑईल तयार करणाऱ्या कारगिल इंडस्ट्रीच्या वतीने हे सर्वेक्षण करण्यात आले. महिलांना स्वयंपाकघरातून वेळ काढून तो स्वतःसाठी देता यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे कारगिल चे मार्केटिंग प्रमुख सुबिन सीवन यासंदर्भात म्हणाले.
Women are not doing hobby due to domestic work
---------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )