लोकल सुरू होऊनही महिलांचे हाल, तिकिटासाठी तासभर रांगेत 

शर्मिला वाळुंज
Thursday, 22 October 2020

सर्वसामान्य महिलांचा लोकल प्रवास बुधवारपासून सुरू झाला. पहिल्या दिवशी महिलांचा थंड प्रतिसाद दिसून आला तरी गुरुवारी थोडे चित्र वेगळे दिसून आले. डोंबिवली आणि दिवा रेल्वे स्थानकात महिलांनी सकाळी १०.१५ वाजल्यापासूनच तिकिटासाठी मोठी रांग लावली होती. लॉकडाऊन काळात बससाठी रांगेत उभे होतो, आता लोकल सेवा सुरू झाल्याने थोडासा दिलासा मिळाला, मात्र, तिकिटासाठी तासभर रांगेत उभे राहावे लागत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला. 

ठाणे : सर्वसामान्य महिलांचा लोकल प्रवास बुधवारपासून सुरू झाला. पहिल्या दिवशी महिलांचा थंड प्रतिसाद दिसून आला तरी गुरुवारी थोडे चित्र वेगळे दिसून आले. डोंबिवली आणि दिवा रेल्वे स्थानकात महिलांनी सकाळी १०.१५ वाजल्यापासूनच तिकिटासाठी मोठी रांग लावली होती. लॉकडाऊन काळात बससाठी रांगेत उभे होतो, आता लोकल सेवा सुरू झाल्याने थोडासा दिलासा मिळाला, मात्र, तिकिटासाठी तासभर रांगेत उभे राहावे लागत असल्याने  महिलांनी संताप व्यक्त केला. 

अधिक वाचा : ठाणेकरांच्या स्वतंत्र धरणासाठी शिवसेनेला जाग येईल का? भाजपची खरमरीत टीका 

सकाळी ११ नंतरच महिलांना रेल्वेस्थानकात प्रवेश मिळत असल्याने तत्काळ तिकीट पकडून लोकल पकडता यावी यासाठी महिला सकाळी १०.१५ वाजल्यापासूनच गर्दी करीत आहेत. डोंबिवली रेल्वेस्थानकात पश्‍चिमेला विष्णूनगर येथे व पूर्वेला रामनगर येथील तिकीट खिडक्‍या आहेत. दोन्ही ठिकाणी तीनच तिकीट खिडक्‍या असल्याने ११ च्या दरम्यान भली मोठी रांग 
लागते.

अधिक वाचा : भाजीपाल्यानंतर कडधान्ये, डाळींचे दर झाले दुपट्ट, ताटात वाढायचे तरी काय? गृहीणीपुढचा प्रश्न

दिवा येथेही हीच परिस्थिती असून, पश्‍चिम दिशेकडील केवळ दोन तिकीट खिडक्‍या सुरू असल्याने आज महिलांची भली मोठी रांग लागलेली दिसून आली. ही रांग पश्‍चिमेपासून ते पूर्वेपर्यंत पोहोचली होती. शारीरिक अंतराचे कोठेही पालन झाल्याचे पाहायला मिळाले नाही. आता तिकिटासाठी तासन्‌तास रांगेत उभेर रहावे लागणार असल्याने महिला वर्गाकडून प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे. 

लॉकडाऊन काळात बसमध्ये प्रवेश मिळावा म्हणून तासन तास आम्ही रांगेत उभे राहात होतो. महिलांसाठी लोकल सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात हाल कमी होतील असे वाटले होते; परंतु येथेही तिकिटासाठी दहा वाजल्यापासूनच रांगेत उभे राहावे लागत आहे. 
- मीनाक्षी यादव, महिला प्रवासी, डोंबिवली. 

ऑफिसने लेट येण्याची परवानगी दिल्याने आजपासून कार्यालय जॉईन केले आहे; परंतु येथे येऊन पाहाते तर पश्‍चिम दिशेकडील रांग ही रेल्वे पुलापर्यंत आली होती. अर्धा तास तरी माझा या रांगेत गेला आहे. 
- प्राची साटम, महिला प्रवासी, दिवा. 

दिवा रेल्वेस्थानकात अपुऱ्या तिकीट खिडक्‍यांमुळे महिलांना दोन दिवस रांगेत ताटकळत उभे रहावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाने याचा विचार करीत तिकीट खिडक्‍यांची संख्या वाढवावी, तसेच एटीव्हीएम मशीनद्वारेही तिकीट देण्यास सुरुवात करावी. 
- ऍड. आदेश भगत, अध्यक्ष दिवा रेल्वे प्रवासी संघटना. 
  

--------------------------
(संपादन : प्रणीत पवार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women queue for hours to get local passenger tickets