‘मधुरांगण’च्या व्यासपीठावर महिलांची धम्माल

‘मधुरांगण’च्या व्यासपीठावर महिलांची धम्माल
‘मधुरांगण’च्या व्यासपीठावर महिलांची धम्माल

नवी मुंबई : तांदूळ, नाचणी, गुलकंद, मलाई, तिरंगा, पनीर, रवा ते बिर्याणी अशा विविध चवींचे व भारताच्या विविध प्रांतातील पारंपरिक व नावीन्यपूर्ण पद्धतींचे मोदक खाण्याची संधी शनिवारी (ता. १७) सकाळ मधुरांगण मोदक बनवा स्पर्धेनिमित्त नवी मुंबईकरांना मिळाली. सकाळ मधुरांगण, श्रीमंत गावदेवी मरीआई ट्रस्ट, वाशी जुहूगांव व माधवबागतर्फे नवी मुंबईतील महिलांसाठी मोदक बनवा स्पर्धा व महाझिम्मा खेळाचे आयोजन करण्यात आले होते. 

सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये पारंपरिक सण-उत्सव व आपली मराठमोळी परंपरा जपण्यासाठी, स्त्रियांना आपली कला व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या संधीचा फायदा घेत नवी मुंबईतील मधुरांगण सदस्यांनीही १२ गावच्या १२ जणी खेळती ग अंगणी, अंगणात रंगली ग माहेरची अशी गाणी म्हणत आपल्या माहेरच्या आठवणी जागवल्या. मराठमोळी नऊवारीची वेशभूषा, पारंपरिक दागिने घालून नटलेल्या महिलांनी सेल्फी, फोटो काढत, शिट्टी वाजवत, मोदकांच्या विविध पाककृतींचे कौतुक करत व विविध स्वरचित गाणी, लोकगीतांच्या तालावर फेर धरून झिम्मा खेळत मधुरांगणच्या व्यासपीठावर धम्माल केली. मंगळागौर व पारंपरिक लोकगीतांवर ताल धरणाऱ्या लहान नातीपासून ते सत्तरीपर्यंतच्या आज्जीबाईंचा उत्साह बघण्याजोगा होता. या वेळी ठाण्याच्या पोलिस उपायुक्त रुक्‍मिणी गलांडे यांनी या खेळात सहभागी होऊन, टाळ्या शिट्ट्यांच्या गजरात महिलांना प्रोत्साहन दिले. आपली परंपरा जिवंत ठेवणे गरजेचे आहे, असे सांगताना वेळ काढून, मेहनतीने व कलाकुसर जपत या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांचे व आयोजकांचे त्यांनी कौतुक केले. स्पर्धेच्या सहआयोजक व राजमाता मरीआई महिला प्रतिष्ठानच्या मनीषा भोईर यांनीही स्पर्धकांचे कौतुक केले व आपली परंपरा जपण्यासाठी आपणच पुढाकार घ्यायला हवा, असे मत व्यक्त केले.

मोदक बनवा स्पर्धेमध्ये नवी मुंबईतील २२ महिला स्पर्धक सहभागी झाल्या. ‘स्मिता’ज किचनच्या स्मिता राव व सेवर बेकरीच्या सारिका गंभीर यांनी परीक्षणाचे काम पाहिले. या स्पर्धेत नेरूळ येथील अनुजा सावंत यांना प्रथम, वाशी येथील सुवर्णा गुप्ते यांना द्वितीय; तर कामोठे येथील वैभवी सावंत यांना तृतीय पारितोषिक मिळाले. छाया वानखेडे व विजया सुतार यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. गावदेवी मरीआई ट्रस्टच्या वतीने उत्तम वेशभूषेसाठी बक्षीस वितरण करण्यात आले. या वेळी वाशी येथील माधवबाग क्‍लिनिक्‍सचे डॉ. नीलेश कुलथे व डॉ. हर्षदा मेखले यांनी मधुमेह, वाढते वजन, हृदयरोग यांसारख्या आजारांबाबत महिलांना मार्गदर्शन केले. डॉ. कुलथे यांनी पश्‍चिमी संस्कृतीमुळे होत असणारे दुष्परिणाम सांगताना आजच्या काळातील जीवनशैलीमुळे मोठ्यांसोबतच लहान मुलांमध्येही दिसणाऱ्या लठ्ठपणा, मधुमेह व हृदयरोगाच्या वाढत्या प्रमाणाबाबत महिलांना सजग केले व ते टाळण्यासाठी व्यायाम व आहार यांचा योग्य समन्वय साधण्याचे तंत्र शिकवले. स्त्रियांमध्ये कोणताही बदल घडवून आणण्याची शक्ती असते. त्यामुळे हे वाढते आजार कमी करण्यासाठी त्यांनी एकत्र प्रयत्न करायला हवेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला माधवबागच्या मीडिया व्यवस्थापक मंगला लोखंडे, डॉ. अमोल मेखले उपस्थित होते.

स्त्रियांमध्ये कोणताही बदल घडवून आणण्याची शक्ती असते. त्यामुळे वाढते आजार कमी करण्यासाठी त्यांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. 
-डॉ. नीलेश कुलथे, माधवबाग क्‍लिनिक्‍स, वाशी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com