'महाराष्ट्राच्या मायभगिनींचा अवमान सहन करणार नाही'! काँग्रेसनेते सचिन सावंत

'महाराष्ट्राच्या मायभगिनींचा अवमान सहन करणार नाही'! काँग्रेसनेते सचिन सावंत

मुंबई : कंगनाबाई भाजपाच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राचा सातत्याने अपमान करत असून तीने आता सर्व मर्यादा पार केल्या आहेत.अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्याबद्दल असहनीय गलिच्छ भाषा वापरून स्वतःची लायकीही तीने दाखवून दिली आहे. महाराष्ट्राला उर्मिला मातोंडकर यांचा अभिमान असून त्यांच्याबद्दल वापरलेल्या अपशब्दाचा जाहीर निषेध करत कंगणाच्या मुखातून वारंवार महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या भाजपाने 13 कोटी जनतेची तात्काळ माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

कंगणा व भाजपा समाचार घेताना सावंत पुढे म्हणाले की, कंगणा राणावतचे प्रताप आता सहनशक्तीच्या पलिकडे गेले आहेत. उर्मिला मातोंडकर यांच्याबद्दल जी भाषा तीने वापरली ती ऐकून महाराष्ट्रातील जनतेच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. हा फक्त उर्मिला यांचा अपमान नसून समस्त मायभगिनींचा अपमान आहे. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील उर्मिला यांनी दर्जेदार अभिनयाच्या जोरावर महाराष्ट्राची संस्कृती व मराठीचा झेंडा सदैव उंचावत ठेवला आहे. त्यांचा अपमान हा मराठीचा व महाराष्ट्राचा अपमान आहे. या सर्व प्रकाराला भारतीय जनता पक्षही तीतकाच जबाबदार आहे. महाराष्ट्रातील सत्ता गेल्यापासून वेडापीसा झालेला भाजपा महाराष्ट्राचा सूड उगवत आहे.

मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या, मुंबई पोलिसांना माफीया म्हणणाऱ्या, दररोज महाराष्ट्र व मराठी अस्मितेला शिव्या देणाऱ्या कंगणाच्या पाठीशी भाजप आहे. भाजप तीला झाशीची राणी म्हणतो, वाय दर्जाची सुरक्षा देतो, राज्यपालांची भेट घडवून आणतो आणि तिच्या आडून महाराष्ट्राला बदनाम करत आहे. राज्यपाल कोश्यारी यांना भेटाला जाताना तीने हातात कमळ घेतल्याचे देशाने पाहिले आहे. आपल्याला भाजपाचा पाठिंबा असून कधीही तिकीट मिळू शकते असे ती आत्मविश्वासाने सांगत असते. कंगणाची सर्व संहिता ही भाजपाच लिहीत आहे, असे सावंत म्हणाले.

भारतीय जनता पक्षाने मागील सहा वर्षात मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. राज्यातील अनेक महत्वाचे प्रकल्प, कार्यालये, ही गुजरातला हलवण्यात मदत करून महाराष्ट्राचे औद्योगिक व आर्थिक महत्व कमी केले. कंगणाला पाठिंबा देत तीचे गुणगौरव गाणाऱ्या भाजपाच्या एक प्रवक्त्याने मराठी कलाकारांना त्यांच्या कमी मानधनावरून हिनवण्याचा नीच प्रकारही केला आहे. आता कंगणाच्या आडून नसते उद्योग करत बॉलिवूडला बदनाम करायचे आणि ही जागतिक दर्जाची चित्रपटसृष्टी मुंबईबाहेर न्यायची असे षडयंत्र रचले गेले आहे, असा गंभीर आरोप सचिन सावंत यांनी केला आहे

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com